पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुधारणा अग्रक्रम व मार्ग । १६५

बडबड वा टवाळी केली, सामाजिक सुधारणेला कितीहि विरोध केला तरी क्रांति अटळ आहे. ते म्हणतात, "हिंदुधर्मविचारांत आणि सामाजिक आचारांत जेवढें कांही खरोखर निर्दोष आहे त्याला कशाचीहि भीति नाही; पण जें कांही सदोष व अहितकारक आहे तें सारें पाश्चिमात्य ज्ञानकुंडांत जळून खाक होणार."
 सामाजिक सुधारणांना अग्रक्रम दिला पाहिजे, असा पक्ष अत्यंत हिरिरीने आगरकरांनी मांडला असला तरी तितक्याच हिरिरीने त्यांनी "राजकीय सुधारणा आधी झाल्या पाहिजेत," असाहि पक्ष मांडला आहे. 'फेरजमाबंदी व लष्करी खर्च' या सुधारकांतील लेखांत (निबंधसंग्रह भाग ३ रा, पृ. ११५-१६) "सामाजिक सुधारणांपेक्षाहि राजकीय सुधारणा विशेष आवश्यक आहेत; म्हणून राजकीय सुधारणा सामाजिक सुधारणांच्या आधी झाल्या पाहिजेत. वास्तविक सुधारणांचा असा क्रम असतांना सरकार त्याचा व्युत्क्रम (उलटापालट) करूं पाहत आहे, (व आमची दिशाभूल करीत आहे,)" असें निःसंदिग्ध प्रतिपादन त्यांनी केलें आहे. आचार्य जावडेकर यांनी 'आधुनिक भारत' या आपल्या ग्रंथांत वरील लेखांतील प्रदीर्घ उतारा देऊन (पृ. १५०- १५१) त्याविषयी विवेचनहि केलें आहे.
बुद्धिपुरस्सर
 या सर्व सुधारणा बुद्धिपुरस्सर केल्या पाहिजेत, असा आगरकरांचा आग्रह होता. कारण त्या सहजगत्या, कालौघाने होणार नाहीत, असें त्यांचें मत होतें. पाश्चात्त्य शिक्षण, लोकसंख्येंतील वाढ, प्रवास इत्यादि कारणांमुळे कांही थोडे बदल आपोआप घडून आले असले तरी, ते चिरस्थायी होण्याचा संभव नसतो; आणि महत्त्वाच्या सुधारणा अशा प्रकारे आपोआप होतहि नाहीत. परिस्थितीच्या प्रभावाने जें होईल तें पत्करणें यांत कांही पुरुषार्थ नाही; तर प्रयत्नपूर्वक वर्तनांतर घडवून आणण्यांत भूषण आहे. म्हणून आगरकरांनी तरुण सुशिक्षित लोकांना अशी विनंती केली आहे की, "तुम्ही कालावर व वस्तुस्थितीवर अवलंबिणें पुरे करून, ज्या सुधारणा तुम्हांस अत्यंत आवश्यक अशा वाटत आहेत त्या करण्याविषयी बुद्धिपूर्वक प्रयत्न करण्यास लागलें पाहिजे. जे लोक असें करीत नाहीत ते हळूहळू दैववादी बनून निरुद्योगी होत्साते क्षीण होत जातात व शेवटीं समूळ नष्ट होतात."
 तरुणांना असें आवाहन करण्याचें कारण हे होतें की, या देशांत असमता वाढत चालली होती; तिची परमावधि होऊन समाजाची दुर्दशा होण्यापूर्वीच तिला आळा घालणें आवश्यक आहे, असें आगरकरांना वाटत होते. वृद्ध किंवा जुन्या मतांच्या लोकांच्या हातून हें कार्य होणें शक्य नव्हतें; कारण त्यांचा सर्व सुधारणांना विरोधच असतो; म्हणून तरुणांनी हें कार्य अंगावर घ्यावें, असें त्यांचे म्हणणें होतें.
कायद्याचे साह्य
 अवश्य त्या सर्व सामाजिक सुधारणा लवकर घडवून आणण्यासाठी कायद्याची कास धरायला मुळीच हरकत नाही, असेंहि आगरकरांचे मत होतें. सर्व कांही काय