पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६८ । केसरीची त्रिमूर्ति

उदासीन आहे, म्हणूनच त्यासंबंधाने स्वातंत्र्याची तुम्ही एवढी ऐट मिरवतां, हें खरें नाही काय? तसें नसेल व तुम्ही खरेंच स्वातंत्र्यप्रिय असाल, तर मग इतर गोष्टींत सरकारची गुलामगिरी कां पत्करतां?"
धर्मात हस्तक्षेप नको!
 समाजसुधारणेला कायद्याची मदत घेण्यास अशिक्षित, पुराणप्रिय व जीर्ण मतवादी लोकांनी विरोध केला तर तें साहजिक आहे; कारण त्यांची मनें संकुचित असतात; पण सुशिक्षित लोकांनीहि कायद्याला विरोध करावा याचें आगरकरांना फार आश्चर्य वाटे. त्यांच्या या विरोधांत योग्यायोग्य विचार नसून दुराग्रहच आहे, असें त्यांनी म्हटलें आहे. सुशिक्षित लोक कायद्याला विरोध करतांना दुसरा युक्तिवाद असा करीत की, सरकार परकीय लोकांचें असल्यामुळे त्याने आमच्या धर्माचारांत ढवळाढवळ करूं नये हें बरें; नाही तर १८५७ साली जसा धर्मनिष्ठ सैनिकांच्या मनाचा क्षोभ होऊन दुर्धर प्रसंग गुदरला, तसाच प्रसंग पुन्हा ओढवेल. पण या आक्षेपांत कांहीच अर्थ नव्हता. कारण सरकार असल्या विरोधाकडे मुळीच लक्ष देत नव्हते किंवा त्याला ज्या सुधारणा इष्ट वाटत होत्या त्या करण्यासाठी कोणाच्या परवानगीकरिता थांबत नव्हतें. सतीची प्रथा बंद करण्याचा कायदा, पुनर्विवाहाचा कायदा त्याने केला तेव्हा कोणाला विचारलें नाही, की कोणाचा विरोध जुमानला नाही. इंग्रज सरकार हिंदु समाजाच्या हितासाठीच असले कायदे करीत असतांना त्याला हे दुराग्रही लोक विरोध करतात; आणि पोर्तुगीज व मुसलमान लोकांनी पूर्वी अनन्वित अत्याचार केले तेव्हा मात्र हिंदु लोकांनी ते निमुटपणें सोसले. म्हणून आगरकर विचारतात, "हे भेकड व प्रतिष्ठाखोर हिंदु लोकांनो, त्या वेळेस तुमचा धर्माभिमान कोठे गेला होता?"
 'सामाजिक सुधारणा आणि कायदा' या लेखांत आगरकरांनी सक्ती केव्हा योग्य व केव्हा अयोग्य याविषयी चर्चा केली आहे. ते म्हणतात, "व्यक्तीच्या ज्या आचरणापासून समाजाचें प्रत्यक्ष अपरिमित नुकसान होत नसेल, तें आचरण जरी त्या व्यक्तीस घातक असले, तरी तिने तें करूं नये अशी सक्ती करण्याचा समाजास अधिकार नाही. व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजबंधन या दोहोसहि मर्यादा आहेत. व्यभिचार किंवा मद्यपान हे वाईट असले तरी, त्यामुळे समाजाला त्रास होत असेल तरच तें करणाऱ्या व्यक्तीला कायद्याने प्रतिबंध करणें योग्य ठरेल; पण सती, केशवपन, वगैरे रूढि इतक्या क्रूर व घातक आहेत की, त्या कायद्याने बंद करणें हेंच हितकारक होय, असें त्यांनी प्रतिपादिले आहे.
 अशा प्रकारे आगरकरांनी समाजसुधारणेसाठी कायद्याचा आग्रह धरला असला तरी कायद्याच्या सामर्थ्याची व उपयुक्ततेची मर्यादाहि ते जाणत होते. कायद्याने सर्व साधेल असें त्यांना वाटत नव्हतें. म्हणूनच त्यांनी तरुण सुशिक्षितांना विज्ञापना केली आहे की, कायद्याला विरोध करूं नका व त्यावर सर्वस्वी अवलंबूनहि