पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भिन्न क्षेत्रांतील अपेक्षित सुधारणा । १७१

स्त्रीविषयक दृष्ट रूढींचा त्यांनी जितका विचार केला आहे तितका विचार त्यांनी इतर बाबतींत केलेला नाही.
 बालविवाह, त्यामुळे होणारे अनर्थ, लहान मुलींवर होणारे अत्याचार, बाल-विधवांची दुर्दशा, स्त्री-पुरुष विषमता, त्यामुळे स्त्रियांवर होणारा अन्याय, त्यांच्या बाबतींतली धर्मशास्त्राची निष्ठुरता, त्या शास्त्राने केलेली स्त्रीची अवहेलना अप्रतिष्ठा याविषयी आगरकरांनी केलेलें जें विवेचन त्याचा आपण हिंदु समाजाच्या शिलावस्थेचें वर्णन करतांना परामर्श घेतला आहे. येथे आता सारार्थानि ते विचार पुन्हा सांगून त्यांनी स्त्री-जीवनविषयक ज्या सुधारणा उपदेशिल्या आहेत, त्यांचा विचार करावयाचा आहे.
 (२) बालविवाह - स्त्रियांच्या दुःस्थितीचें प्रधान कारण म्हणजे हिंदु समाजांतील बालविवाहाची रूढि हें होय. स्त्रीच्या नशिबी येणारी बहुतेक सर्व दुःखें, सर्व आपत्ति, या रूढीमुळेच येतात व त्यामुळे समाजाचीहि अपरिमित हानि होते, असें आगरकरांनी वारंवार सांगितलें आहे. तरुण सुशिक्षितांस विज्ञापना करतांना ते म्हणतात, "ज्याप्रमाणे जोरदार वृक्ष निपजण्यास मूळ अंकुर जोरदार पाहिजे; त्याप्रमाणे देशांत सुदृढ स्त्री-पुरुष निपजण्यास, सुदृढ मुलें होण्यास, वैद्यकशास्त्रांत जो खऱ्या विवाहाचा काल सांगितला आहे त्याचें उल्लंघन होतां कामा नये. या कालाचें उल्लंघन आम्हांकडून आज अनेक वर्षे होत असल्यामुळे आमची प्रजा क्षीण, अल्पायुषी, श्रम करण्यास नादान, उत्साहशून्य व भेकड अशी होत आहे. आमच्या शरीर-सामर्थ्याचा लोप झाल्यामुळे आमचें मानसिक सामर्थ्यहि नाहीसे होत आहे. बालविवाह बंद झाल्यास आज घरोघरीं ज्या हतभाग्य बालविधवा दृष्टीस पडतात त्या दृष्टीस पडेनाशा होतील, पुरुषांच्या अंगीं अधिक पौरुष दृष्टीस पडूं लागेल, तरुणांस अधिक उद्योग करण्याची हिंमत येईल व धाडसाचीं कामें अंगावर घेण्याची छाती होऊं लागेल. विवाहापूर्वी मुलींस ज्ञानसंपादण्यास अधिक फुरसद मिळाल्यामुळे पुढे त्यांच्या हातून अपत्यसंवर्धनाचें व प्रपंच चालविण्याचे काम अधिक चांगल्या रीतीने होऊं लागेल. पण हें सर्व होण्यास बालविवाहाची चाल बंद झाली पाहिजे आणि ती बंद होणें न होणें सर्वथैव तुमच्यावर आहे." तरुणांना असा उपदेश करून त्यांनी ही चाल बंद करण्यासाठी 'महाराष्ट्र बालविवाह निषेधक मंडळी' स्थापावी अशी सूचना केली आहे व अशी मंडळी स्थापन झाल्यास तिचा पहिला सभासद होण्यास 'सुधारक' तयार आहे, असें आश्वासन दिलें आहे. केवळ स्त्रीसमाजावरच नव्हे तर या देशावर ओढवलेल्या बहुतेक सर्व अनर्थपरंपरा या बालविवाहामुळेच ओढवल्या आहेत, असा आगरकरांचा निश्चित सिद्धान्त होता, हें वरील उताऱ्यावरून दिसून येईल.
 'सामाजिक सुधारणा आणि कायदा' या लेखांत बालविवाहाच्या रूढीवर व तिचें समर्थन करणाऱ्यांवर आगरकरांनी अत्यंत प्रखर टीका केली आहे; आणि