पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/१८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भिन्न क्षेत्रांतील अपेक्षित सुधारणा । १७३

आज पुन्हा अनुसरण्यास कांहीच हरकत नाही. हा मुद्दा सांगतांना श्रीकृष्ण-रुक्मिणी, अर्जुनसुभद्रा, वत्सला-अभिमन्यु, शकुंतला-दुष्यंत, नल-दमयंती यांची उदाहरणे आगरकर देतात; आणि हिंदुसमाजधुरीणांना सांगतात की, एकीकडे या प्राचीन स्वयंवरांचें व ती पद्धत स्वीकारणाऱ्या स्त्री-पुरुषांचें तुम्ही कौतुक करतां आणि सध्या ती पद्धत अवलंबावी असें म्हणणाऱ्यांवर दुसरीकडे भडिमार करता; तेव्हा तुम्ही रूढींचे दास आहांत, भेकड आहांत, जें सत्य दिसतें त्याचा पुरस्कार करण्यास लागणारें मनोधैर्य तुमच्याजवळ नाही कोणी म्हणतील की, प्राचीन काळी ती पद्धत योग्य होती; पण सध्या मात्र ती हितावह नाही. त्यावर आगरकर विचारतात की, असें म्हणण्याचें कारण काय? शकुंतला, मालती, सुभद्रा, आणि, दुष्यंत, माधव, अर्जुन इत्यादि पौराणिक स्त्री-पुरुषांच्या प्रकृतींत आणि आजच्या आमच्या प्रकृतींत जमीन-अस्मानाचें अंतर पडलें आहे काय? असें आम्हांस बिलकुल वाटत नाही. तारुण्य, आरोग्य, बुद्धि, संपत्ति, स्वरूप, विद्या जितकें त्यांना प्रिय होते तितकेंच आम्हांसहि आहे. दुःखाचा कंटाळा व सुखाचा अभिलाष जितका त्यांना होता तितकाच आम्हांलाहि आहे. तेव्हा स्वयंवरामुळे ते स्त्री-पुरुष जितके सुखी होत. तितकेच आजचे स्त्री-पुरुषहि होण्याचा संभव आहे.
 आगरकरांची वृत्ति कशी क्रांतिकारक होती तें यावरून दिसून येईल. बालविवाह, वैधव्य, स्वयंवर इत्यादि रूढींबद्दल जीर्णवादी लोकांहून त्यांची मतें तर भिन्न होतीच; पण प्राचीन काळचे स्त्री-पुरुष पुण्यशील, धर्मनिष्ठ, तो काळच सत्ययुगाचा, धर्मोत्कर्षाचा; आणि आजचे स्त्री-पुरुष पापी, धर्मभ्रष्ट व आजचा काळ हा कलियुगाचा, धर्महानीचा अशी जी विकृत विचारसरणी हिंदु समाजांत रूढ झालेली होती व जी सर्व अधःपाताला कारण झाली होती तिच्याविषयीच भिन्न मत सांगून त्यांनी मुळावरच घाव घातला आहे.
 (४) राष्ट्रीय चारित्र्य - बालविवाहाची रूढि व स्वयंवर- पद्धतीचा अभाव यांचा केवळ आरोग्य, व सुदृढ प्रजा यांशींच संबंध आहे असें नव्हे. आगरकरांच्या मतें या दोन पद्धति सर्व राष्ट्रीय चारित्र्याच्या निदर्शक आहेत. प्रियाराधन या लेखाचा समारोप करतांना अत्यंत तीव्र व कडवट भाषेत त्यांनी आपले याविषयीचे विचार मांडले आहेत. ते म्हणतात, "ज्या लोकांना कोणों तरी पसंत केलेल्या बायका चालतात, ज्या लोकांना रत्युपभोगासाठी दुसऱ्यांनी कोंडून घालावें लागतें, ज्या लोकांना ज्ञानसंपादन, द्रव्यसंपादन, लौकिकसंपादन सामर्थ्यसंपादन, विषयसौख्य- रसज्ञान- संपादन यांपैकी कोणतीहि गोष्ट कमाविण्यापूर्वी 'जबरीसंभोग' करण्याची चटक लागली आहे व ज्यांच्या हातून या पापामुळे प्रतिदिवशी प्रेमाचे हजारो खून पडत आहेत, शारीरिक व मानसिक अनंत यातना भोगाव्या लागत आहेत, विद्या व वित्त संपादण्याची बिलकुल कुवत राहिलेली नाही, खऱ्या जातिविशिष्ट सुखाची कल्पना ज्यांच्या स्वप्नांत सुद्धा येत नाही, ज्यांना संसार असार होऊन गेला आहे व