पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भिन्न क्षेत्रांतील अपेक्षित सुधारणां । १८५

मनांत टिकून राहणें शक्यच नसतें. हें जाणूनच आगरकरांनी मानवी समाजाची पूर्णावस्था पुढे आहे, हा सिद्धान्त मांडला आहे. कारण मनुष्यजातीचें ऐहिक सुखसंवर्धन हें त्यांचें अंतिम उद्दिष्ट होतें.
 (४) विषयसुखाचें महत्त्व - ऐहिक, भौतिक सुखभोगाचें महत्त्व आगरकर सांगतात तो विचार असाच क्रान्तिकारक आहे. सर्व धर्मानी या सुखभोगांची निंदाच केलेली आहे. वेदान्ती संन्यासमार्गी, पारलौकिक धर्मनिष्ठ पंडित नेहमी संसार, स्त्री-पुत्र, धन, राज्य, वैभव यांचा तिरस्कार करतात व त्यांचा त्याग केला पाहिजे, त्यावांचून मोक्ष मिळणार नाही, असें प्रतिपादन करतात. पण मानवजातीचें मोक्ष हें ध्येय आहे हेंच आगरकरांना मान्य नाही. अखिल मानवजातीला ऐहिक सुखाचा लाभ करून देणें यालाच ते धर्म मानतात. त्यामुळे ऐहिक सुखभोगाचें ते आध्यात्मिक सुखासारखेंच आदराने वर्णन करतात. "भात-भाकरीवर कसा तरी जीव राखावा व दोन जाडेभरडे कपडे घालून शरीर झाकावें यापलीकडे आमच्या लोकांची सुखोपभोगाची कल्पना जातच नाही" याविषयी खेद प्रदर्शित करून आगरकर म्हणतात, "आपल्यामध्ये स्वसुखोपभोगाची ही जी हेळसांड, माजली आहे, ती अत्यंत दूषणीय आहे, इतकेंच नव्हे तर ती देशाला शारीरिक व मानसिक दारिद्र्य येण्याचे आदिकारण होय. (केसरींतील निबंध, पुस्तक दुसरें, पृ. १२२). ऐहिक सुखाकडे या दृष्टीने पाहण्याची प्रवृत्ति असल्यामुळेच आगरकरांनी त्याचे पुढील उद्गार काढले आहेत. "तीव्र भूक व विषयवासना यांस उत्तम रीतीने भागवितां आल्यास जें समाधान होतें तें अद्वितीय व अवर्णनीय आहे, हें सत्यप्रिय व विचारी मनुष्यास कबूल केलें पाहिजे" (पू. १४४). ऐहिक सुखाची व त्यांतल्या त्यांत विषयसुखाची उठल्याबसल्या निंदा करण्यास चटावलेल्या वेदान्त-प्रवण मनुष्यास हे उद्गार अगदी असह्य होतील; पण हेच विचार राष्ट्राच्या समृद्धीला व म्हणूनच लोकशासनाला पायाभूत होत असतात हें जाणून ते निर्भयपणे सांगितल्याबद्दल आपण आगरकरांना शतशः धन्यवाद दिले पाहिजेत.
 (५) प्रवृत्तिवाद - ऐहिक सुखाविषयी असा दृष्टिकोण असलेला पंडित प्रवृत्तिवादाचाच पुरस्कार करणार यांत शंका नाही. आगरकरांनी अनेक ठिकाणी तसा पुरस्कार केला आहे. 'समाजोत्कर्षाचा एक मुख्य घटक' या निबंधांत ते म्हणतात, "मनुष्यांत व इतर प्राण्यांत एक मोठा भेद आहे. उदरपोषण व स्वजातिवर्धन यांशिवाय इतर सुखांची इतर प्राण्यांना कल्पनाहि नसते; पण मनुष्याला या दोन सुखांशिवाय इतर अनेक मानसिक व शारीरिक उपभोग घेण्यासारखीं मनें व शरीरें प्राप्त झालीं आहेत व त्या अनेक सुखोपभोगांकडे त्याची प्रवृत्तीहि आहे. आता यामुळे मनुष्य अधिक सुखी आहे की नाही याचे समाधानकारक उत्तर देतां येईल, असें वाटत नाही. थोड्या वासना व थोडी तृप्ति आणि पुष्कळ वासना व पुष्कळ तृप्ति या दोन स्थितींपैकी इष्टतर कोणती याचा निर्णय करण्यास कोण समर्थ होणार आहे? या