पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२०४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भिन्न क्षेत्रांतील अपेक्षित सुधारणा । १८९

लोकांच्या मालकीची आहे. बाकी सर्व लोक भुकेकंगाल झालेले आहेत. ई. इं. कंपनी इथला कारभार पाहत होती तेव्हा इथल्या लोकांची स्थिति बरी होती; पण ब्रिटिश सरकारचें राज्य सुरू झाल्यापासून ती खालावत गेली आणि आता तर कमालीची बिघडली आहे. कांही उदार वृत्तीचे इंग्रज लोक हें जाणतात व तसें कबूलहि करतात; पण इथला कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना मात्र तसें वाटत नाही. इथे सर्वं आबादीआबाद आहे, इथले लोक सुखी आहेत, अशी त्यांची समजूत झाली असून, त्याप्रमाणे ते ब्रिटिश सरकारला व लोकांना सांगतात.
 अठराव्या शतकांत हिंदुस्थानांत चांगली समृद्धि होती, असें एका इंग्रज मनुष्याने लिहून ठेवलें आहे. इथल्या लोकांना आवश्यक अशा सर्व गोष्टी इथे भरपूर मिळत होत्या. कशाची कमतरता नव्हती. पण त्यानंतर एका शतकाच्या आंत, इथे इंग्रजांचें राज्य आल्यामुळे आता भयानक दारिद्र्य पसरलें आहे. हिंदुस्थानाचा वित्तक्षय चालू आहे. ब्रिटिश लोकांनी जी राज्यव्यवस्था इथे सुरू केली आहे व जे कायदे केले आहेत ते सर्व ब्रिटिश लोकांच्या व व्यापाऱ्यांच्या हितार्थ केले आहेत. त्यामुळे या देशाचें सतत शोषण चालू आहे. चरकांत घालून उसाचा रस काढतात त्याप्रमाणे ते परकीय राज्यकर्ते हिंदी लोकांचें रक्त पिळून घेत आहेत. ही राज्यपद्धति आर्थिक दृष्टीने हिंदुस्थानला अत्यंत हानिकारक असून, तिच्यामुळे आम्ही लवकरच नाहीसें होऊं, असें भय आगरकरांनी व्यक्त केलें आहे; पण पुढे त्यांनी असेंहि म्हटलें आहे की, इंग्लंडमध्ये मेकॉले, रिपन यांच्यासारखे उदार वृत्तीचे बरेच लोक असून, ते हिंदुस्थानावर अशी विपत्ति येऊ देणार नाहीत, असें वाटतें.
 इंग्रज लोक जाणुनबुजून आम्हांला दारिद्र्याच्या खाईत लोटत नसले तरी, त्यांनी केलेल्या कायद्यांमुळे तसें नकळत घडत आहे, हें खरें. म्हणून त्यांच्या नजर- चुकीने आमचें जें नुकसान होत आहे तें त्यांच्या ध्यानांत आणून दिले पाहिजे. त्यांना वस्तुस्थिति समजावून दिली पाहिजे, असेंहि आगरकरांनी म्हटले आहे.
 जगांत जे सुधारलेले देश आहेत, त्यांतील हिंदुस्थान हा सर्वांत गरीब आहे, हे दाखविणारे कांही आकडे आगरकरांनी आपल्या लेखांत दिले आहेत. ग्रेट ब्रिटनमधील प्रत्येक माणसाचें वार्षिक उत्पन्न ४२० रुपये, कॅनडांतील माणसाचें २६९ रूपये, हॉलंडमधे २६०, फ्रान्समध्ये २५८, जर्मनीत १८८, पोर्तुगालमधे १४०, नॉर्वेत १३०, रशियांत १००, तर हिंदुस्थानांतील प्रत्येक माणसाचे सरासरी वार्षिक उत्पन्न फक्त २० रुपये; आणि त्यांतले सगळे त्याला मिळतेंच असें नाही. कांही भाग परदेशांत जातो. त्याचा वार्षिक खर्च मात्र ३० रुपये असतो. याचा अर्थ असा की, बहुसंख्य लोकांना पोटभर अन्न मिळत नाही. माणसाचा निरोगीपणा ज्यावर अवलंबून असतो, तें मीठ देखील आपल्याला योग्य प्रमाणांत मिळत नाही. इंग्लंडमधील प्रत्येक माणसामागे ७० पौंड मीठ खर्च होतें, तर हिंदुस्थानांत प्रत्येकाला वर्षांत १० पौंडच मीठ मिळते. या हलाखीचे भयंकर परिणाम हिंदुस्थानांतील लोकांवर स्पष्ट दिसत