पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्राचीन परंपरेचा अभिमान । १९७

गोष्ट त्यांना उद्वेगजनक वाटत होती; कारण ख्रिस्ती लोकांच्या धर्मसमजुती कांही अधिक चांगल्या नव्हत्या. देश ख्रिस्ती व्हावा, ही कल्पनाहि त्यांना असह्य वाटत होती. पाश्चात्त्य लोकांचे जे विचार योग्य वाटत असतील, ज्या कल्पना ग्राह्य असतील त्यांचा स्वीकार केला पाहिजे हें खरें पण जुनें असेल तेवढे सर्व टाकून, प्रत्येक गोष्टींत परकीयांचे अनुकरण करणें ही सुधारणाहि नव्हे व तें हितावहहि नाही; तर भारतीय संस्कृतीमधील चांगल्या गोष्टी न सोडतां अवश्य तेवढ्याच पाश्चात्त्य कल्पना अंगीकारणें उचित होय, असें त्यांनी प्रतिपादिले आहे.
भारतीय कला
 स्वधर्म व स्वसमाज यांवर टीका करतांना आगरकरांनी आपले असंख्य दोष दाखवून, आपल्या समाजाची इंग्रजांशी तुलना करून आपण अत्यंत क्षुद्र लोक आहों, असे म्हटलें आहे; पण असे असले तरी त्यांनी असेंहि स्पष्टपणे सांगितलें आहे की, आज आपली स्थिति अतिशय हीन झाली असली तरी तेवढ्यावरून प्राचीन काळींहि आपली तशीच स्थिति होती असें मुळीच सिद्ध होत नाही. अनेक लेख लिहून त्यांनी असे दाखवून दिलें आहे की, आम्ही ज्याचा अभिमान धरावा असे खूपच वैभव आमच्या प्राचीन इतिहासांत होतें. ते म्हणतात, "नीति, औदार्य वगैरे मानसिक गुणांचा, किंवा काव्य, चित्र, गायन, वादन इत्यादि ललितकलांचा, अथवा दुर्गरचना गृहरचना, मूर्तिघटना, पाषाणखनन इत्यादि शिल्पकलांचा येथे अभ्युदय होऊन त्यांची इतकी समृद्धि झाली होती की, त्या संबंधाने आजमितीस सुद्धा आम्हांस कोणापुढेहि खाली पाहण्याची आवश्यकता नाही.
 जी नवीन यंत्रकला पाश्चात्त्य देशांत विकास पावली आहे, ती युरोपियन लोकांकडून आम्हांला शिकायला हवी हें खरें; पण आमची जुनी हस्तकलाहि उच्च दर्जाची होती आणि तिचें रक्षण करणें अत्यंत आवश्यक आहे, असें मत आगरकरांनी प्रगट केलें आहे. जुन्या हस्तकलेच्या विकासासाठी त्या नवीन यंत्रकलेचें साहाय्य घेतलें पाहिजे; नाही तर तिचा लोप होईल, असें त्यांचें म्हणणें आहे. ती हस्तकला अभिमानास्पद असल्यामुळेच ती नष्ट होणें त्यांना इष्ट वाटत नव्हतें.
पाश्चात्त्य पंडितांची टीका
 कांही पाश्चात्य पंडितांनी अशी टीका केली आहे की, हिंदुस्थानांतील लोकांनी स्वतः कलाकौशल्याची अभिवृद्धि कधीच केलेली नाही; जें कांही हस्त-कौशल्याचें काम इथे दिसतें, तें सर्व त्यांनी ग्रीक, रोमन व मुसलमान यांच्याकडून शिकन केलेलें आहे. त्यांचे स्वतःचें असें येथे कांही नाही. हें विधानं कसें साफ चुकीचें आहे हें सिद्ध करण्यासाठी आगरकरांनी पुष्कळ परिश्रम करून साधकबाधक पुरावे गोळा केले आहेत. यासंबंधी त्यांनी जें विवेचन केलें आहे, त्याचा सारांश खाली दिला आहे, त्यावरून भारतीय कलांचें पुराणत्व निर्विवादपणें सिद्ध होतें, यांत शंका नाही.