पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यक्तिमत्व । २०५

अहंप्रत्यय
 पाश्चात्त्य तत्त्वज्ञान व एकंदर पाश्चात्त्य विद्या ह्यांच्या अखंड चिंतनाने त्यांची अस्मिता, त्यांचा अहंप्रत्यय हा विष्णुशास्त्री, टिळक यांच्याइतका प्रबळ झाला होता. किंवा तो जास्तच प्रबळ असण्याची शक्यता आहे. पाश्चात्त्य आक्रमक, मिशनरी आणि पाश्चात्त्य पंडित यांशी सामना करावयाचा असल्यामुळे या तीनहि महापुरुषांचा अहंप्रत्यय हा अत्यंत प्रबळ व तेजस्वी असणें अवश्यच होतें. त्यावांचून या संग्रामांत ते क्षणमात्र टिकूं शकले नसते; पण आगरकरांना इतरांच्या मानाने दसपट मानसिक बळाची आवश्यकता होती. कारण त्यांना वरील सर्वांशी सामना देऊन शिवाय स्वजनांशी लढा करावयाचा होता. स्वजनांविरुद्ध, स्वधर्मीयांविरुद्ध व स्वदेशीयांविरुद्ध आणि एकंदर विश्वाविरुद्ध एकट्याने उभ राहवें, ही परंपरा भारतांत केव्हाच नव्हती. युरोपांत सॉक्रेटिसने ती सुरू केली; आणि वायक्लिफ, जॉन हस, लूथर यांनी व पुढे विज्ञानवेत्त्यांनी ती अखंड चालविली. विश्वाविरुद्ध उभें राहण्याची ही परंपरा भारतांत प्रथम कृतीने महात्मा फुले यांनी व तत्त्वज्ञानाने आगरकरांनी सुरू केली. अशा पुरुषांचा आत्मप्रत्यय हा इतरांपेक्षा दसपटींनी, शतपटींनी भक्कम असला पाहिजे यांत शंकाच नाही. आगरकर त्या आत्मिक बलाने अगदी संपन्न होते. त्यामुळेच मनु-पाराशर, देवदेवता, पुराणे, स्वकालीन विरोधक, निकटचे सहकारी, इंग्रज स्वार्थी पंडित, मिशनरी व राज्यकर्ते ह्यांच्यांशी अखंड, आमरण झुंज देण्याचें सामर्थ्य त्यांना लाभलें.
धीर पुरुष
 या जगांत सुखाने जगण्यासाठी लोकप्रियता, राजमान्यता व पैसा यांचा आधार अवश्य असतो. न्या. रानडे यांना लोकप्रियता आरंभी तितकीशी नव्हती, पण पुढे ती बरीच मिळाली. राजमान्यता तर प्रारंभापासूनच त्यांना विपुल प्रमाणांत लाभली. पैशाच्या दृष्टीने ते चांगले संपन्न होते. टिळकांना राजमान्यता शून्य! नव्हे, शून्याच्याहि खाली; पण ती उणीव लोकप्रियतेने पूर्ण भरून निघाली होती. पुढे पुढे लोक त्यांना परमेश्वरच मानीत. पैशाच्या दृष्टीने पाहतां आरंभी त्यांना सुस्थिति नव्हती तरी उत्तर काळीं ती चांगलीच मिळाली होती. आगरकरांना यांतलें कांहीहि लाभले नाही. जन्मापासून दारिद्र्य त्यांच्या राशीस होतें. त्याने त्यांची पाठ शेवटपर्यंत कधीहि सोडली नाही. देव-धर्म, श्रुति स्मृति यांशी त्यांनी वैर धरल्यामुळे त्यांना लोकप्रियता कधीच मिळणे शक्य नव्हतें, आणि टिळकांइतकेंच ते इंग्रज सरकारला शत्रु लेखीत असल्यामुळे राजमान्यतेचें सुखहि त्यांना कधी प्राप्त झालें नाही. अशा स्थितीत भरल्या जगांत पूर्ण एकाकीपणें, आपल्या विवेकाने सांगितलेल्या सत्यासाठी अविरत, अविश्रांत, झुंजत राहणारे आगरकरांसारखे. धीरपुरुष जगांत दुर्मिळच असतात.