पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/२९०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संघशक्तीची उपासना । २७५

त्यांचें संपादन होण्यासाठी जं. उपाय योजावयाचे त्यासाठी सर्वं हिंदुस्थानभर एकमेकांच्या साह्याने, एकदिलाने व एकोप्याने परिश्रम चालावे. हा हेतु तडीस गेल्यास ब्रिटिश सरकारच्या अमलाखाली आतापर्यंत संकीर्ण असलेले जे महाराष्ट्र, कानडा, बंगाल, सिंध, मध्यप्रांत, वायव्यप्रांत इत्यादि राष्ट्र-मणि ते अन्योन्यसाधारण अशा कार्यसरांत गुंफिले जाऊन राष्ट्रीय संबंधांत त्यांची एक माला होईल; व असें झाल्यास "कलौ संघे शक्तिः' या वाक्याची पूर्तता होऊन आमच्या सुधारणेचें पाऊल थोडें जलदीने पडूं लागेल."
एकराष्ट्रीयत्व
 हें पहिल्या काँग्रेसविषयी झालें. येथून पुढे राष्ट्रीय सभेच्या प्रत्येक अधिवेशनाच्या वेळीं लोकजागृति व एकराष्ट्रीयत्वाच्या पायावर या जागृत लोकशक्तीची संघटना, हाच मंत्र टिळक देत असत; आणि यासाठी खेड्यापाड्यापर्यंत काँग्रेसची चळवळ पसरली पाहिजे, असे आग्रहाने सांगत असत. १८, १०, १८९२ च्या केसरीत त्यांनी लिहिलें आहे की, "राष्ट्रीय सभेत ऐकमत्य होण्यापूर्वी प्रत्येक प्रांतांत त्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यांत व त्यापूर्वी प्रत्येक खेड्यांत तें झालें पाहिजे. अशा नैसर्गिक क्रमाने ज्या दिवशी आमचे प्रयत्न चालू लागतील तेव्हाच आम्ही राजकीय हक्क भोगण्यास पात्र होऊं व सरकारहि आमचें म्हणणे ऐकेल, हें प्रत्येक देशहितचिंतकाने लक्षांत बाळगलें पाहिजे." याच लेखांत ते पुढे म्हणतात, "सामाजिक, औद्योगिक वगैरे कोणतीहि सुधारणा असो, दर वेळीं आपलें राजकीय पारतंत्र्य आड येतें, हा अनुभव सर्वांस आहेच. यासाठीच वेळोवेळी जाहीर सभा करून, व्याख्यानें देऊन आणि वर्तमानपत्रांतून व पुस्तकरूपाने लेख लिहून लोकमत जागृत केलें पाहिजे."
मजबूत पाया
 अकरावी राष्ट्रीय सभा या लेखांत (केसरी, ६-८-९५) लोकमान्यांनी एक-राष्ट्रीयत्वाचा असाच विचार मांडला आहे. ते म्हणतात, "राष्ट्रीय सभेच्या विस्तीर्ण मंडपांत, बंगाली, मद्रासी, सिंधी, पारशी, मुसलमान आदि करून सर्व जातींचे लोक एकदिलाने व एकचित्ताने राजकीय व राष्ट्रीय प्रश्नांचा विचार करतांना ज्यांनी पाहिले असतील त्यांची हिंदुस्थानच्या भावी उदयाचा व ऐक्यतेचा राष्ट्रीय सभा हा एक मजबूत पायाच होय, अशी खात्री होऊन, त्यांची मनें आनंदाने भरून गेलीं असतील. आमच्या हिंदुस्थानांत पूर्वी छप्पन्न देश होते असा इतिहास आहे, पण इंग्रज सरकारच्या सार्वभौमत्वाखाली हे छप्पन्न देश मोडून त्यांचा एकजीव अथवा एकराष्ट्र होण्याचा समय आला आहे हें राष्ट्रीय सभेवरून जितकें पूर्णपणें व्यक्त होतें तितकें दुसरें कशावरूनहि व्यक्त होत नाही."
सर्वांचा एकजीव
 राष्ट्रीय सभेच्या कार्याचें महत्त्व विशद करतांना पुढे त्यांनी म्हटलें आहे की; "इंग्रजांच्या राज्यांत सर्व देशभर एकभाषा, सर्वत्र एक कायदा, एक राज्यपद्धति,