पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२९० । केसरीची त्रिमूर्ति

वाटे व ते त्यांचा आदर करीत. या कार्यकर्त्यांचा मुख्य हेतु कामगारांना स्वराज्याच्या चळवळीत सामील करून घ्यावें हा होता; पण असें करतांना आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीची व विशेषतः रशियांतील १९०५-७ या वर्षांतील क्रांतीची ते कामगारांना माहिती देत व तिची तत्त्वेंहि सांगत. टिळकांना १९०८ सालीं शिक्षा झाल्यावर खाडिलकरांनी केसरीत 'मुंबई ही आमची आघाडीची सेना आहे' या मथळ्याखाली पांच लेख लिहून कामगार संघटनेचीं सर्व तत्त्वें त्यांत सांगितलीं होतींच.
 त्या वेळचे मुंबईचे गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क यांनी टिळकांना झालेल्या शिक्षेचें समर्थन करतांना आपल्या गुप्त अहवालांत म्हटलें आहे की, "टिळकांचे कामगारांवर वर्चस्व इतकें होतें की, त्यापासून साम्राज्याला धोका निश्चित झाला असता. त्यांना शिक्षा झाली नसती तर त्यांनी सार्वत्रिक संप (जनरल स्ट्राइक) निश्चित घडवून आणला असता." त्या वेळच्या पोलिस-अहवालांतहि म्हटलें आहे की, टिळकांना लोक परमेश्वरच मानीत, आणि ते आपल्या कल्याणासाठी झटतात म्हणूनच सरकारने त्यांना तुरुंगांत टाकले आहे असें कामगारांना वाटे. (उक्त ग्रंथ, पृ. ५८८-९१).
 या रशियन पंडितांनी अनेक ठिकाणी मुक्तकंठाने लो. टिळकांचा गौरव केला आहे, आणि बहुतेक जागीं त्यांच्या कार्याचें योग्य असें मूल्यमापन केलें आहे; पण मधूनच केव्हा तरी त्यांच्या मनांतला मार्क्सवाद जागा होतो, आणि टिळकांचा दृष्टिकोन वर्गीय होता, मध्यमवर्गीय बुद्धिवादी दृष्टीमुळे त्याला मर्यादा पडत, कामगारांच्या स्वतंत्र चळवळीचें व कामगार नेतृत्वाचें महत्त्व त्यांनी जाणलें नाही, बुद्धिजीवी वर्गाकडेच त्यांनी अखेरपर्यंत नेतृत्व ठेविलें, अशा तऱ्हेचे आक्षेप ते घेतात. त्यांचें सविस्तर विवेचन येथे करावयाचें नाही; पण आपण एक गोष्ट ध्यानांत ठेवली पाहिजे की, मार्क्सचीं हीं तत्त्वें आता अगदी हास्यास्पद ठरली आहेत. राष्ट्रीय पातळीवरचे लढे जगांत केव्हाहि वर्गविग्रहाच्या तत्त्वावर आणि कामगारांच्या नेतृत्वाने झाले नाहीत. खुद्द रशियांत व चीनमध्येहि नाहीत; आणि वरील आक्षेप घ्यावयाचेच ठरले तर ते सोव्हिएट व चिनी नेत्यांवर जसेच्या तसे घेतां येतील.
 तेव्हा टिळकांचें धोरणच बरोबर होतें. वर्गविग्रह हा भारताला घातक होईल असें त्यांचें निश्चित मत होते. इंग्लंडमध्ये असतांना डेप्युटेशनचे एक सभासद डॉ. वेलकर यांच्याशीं बोलतांना ते म्हणाले "भांडवलदार व कामगार असा लढा हिंदुस्थानांत होणें मला इष्ट वाटत नाही. कामगारांच्या संघटना मी निश्चित उभारणार आहे; पण त्या सोशल वेल्फेअरच्या पायावर. विमा-योजना, इस्पितळें, सहकारी पतपेढ्या, क्रीडा-केंद्रे अशा तऱ्हेच्या सुखसोयी कामगारांना मिळवून देणें हें त्यांचें उद्दिष्ट राहील. मुंबई ही मजुरांची आहे. त्यांच्या श्रमावर मुंबईची श्रीमंती अवलंबून आहे; पण नुकत्याच जन्मास आलेल्या आपल्या देशांतील कारखान्यांना व गिरण्यांना परदेशी गिरण्या- कारखान्यांशी स्पर्धा करावयाची आहे. अशा स्थितींत मजुरीचे दर कृत्रिम रीतीने वाढवून कसें चालेल?" (आठवणी खंड २, पृ. ८१).