पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लो. टिळक व सामाजिक सुधारणा । ३०१

सापडतात. सूत्रकाल व त्यानंतरचा स्मृतिकाल या काळांत हिंदुधर्मशास्त्र फार प्रतिगामी व अनुदार झालें. त्यांच्या अगोदरचा काळ म्हणजे वेदकाळ. ब्राह्मणे, उपनिषदें यांचा श्रुतींतच समावेश होतो; आणि स्वतः टिळकांनी, 'अस्पृश्यता वेदशास्त्रास संगत नाही', 'सूत्रकालापूर्वी मुलींचे विवाह प्रौढ वयांत होत असत,' असें म्हटलें आहे. शिवाय गीतेवर भाष्य लिहितांना, स्वमतविरोधी अशीं वेदोपनिषदांची वचनेंहि त्याज्य ठरविली आहेत. असें असतांना, सुधारणा करतांना प्राचीन धर्मशास्त्राचा मान ठेवण्याचा प्रश्न उद्भवतच नव्हता. कारण वर्ण, जाति यांची समता, त्यांचे संकर-विवाह, व्यवसाय-स्वातंत्र्य, स्त्रीजीवनविषयक सर्व सुधारणा यांना प्राचीन शास्त्रांत वाटेल तेवढे आधार सापडतात. त्यामुळे लोकमान्यांनी सुधारकांना विरोध करतांना, प्राचीन धर्मशास्त्राचा आधार घ्यावा, आणि ग्रामण्य-प्रकरणी व विलायतच्या प्रवासाहून परत आल्यानंतर, अत्यंत उपेक्षणीय अशा धर्मवचनांन्वये प्रायश्चित्त घ्यावें हें विपरीत वाटतें. परदेश-प्रवास- निषेधाला तर वेद, उपनिषदें, सूत्रे, स्मृति यांत मुळीच आधार नाही. दहाव्या-अकराव्या शतकांतील कलिवर्ज्यासारख्या एका क्षुद्र प्रकरणाने (टीका- ग्रंथाने) तो निषिद्ध मानला आहे. तो पुढच्या काळच्या लोकांनी तसा मानल्यामुळेच, भारताची अपरिमित हानि झाली आहे. लोकमान्यांनी परदेशगमन टाळले नाही; पण तें पाप आहे हें प्रायश्चित्त घेऊन, मान्य केले. ज्या युगंधर महापुरुषाने गीतारहस्य सांगतांना प्रत्यक्ष श्रुतिवचनांपुढे शरणागति पतकरली नाही, शंकराचार्यांचें गीताभाष्य व भागवतपुराण या श्रुतिसम प्रतिष्ठा पावलेल्या ग्रंथांपुढे शरणागति पतकरली नाही त्याने एका अत्यंत अविवेकी, मूढ धर्मशास्त्रकारापुढे शरणागति पतकरलेली पाहून मनाला फार क्लेश होतात.
वेदोक्त
 वेदोक्त प्रकरणांत तर लोकमान्यांनी केवळ वहिवाट व रूढि यांच्याच आधारावर, कोल्हापूरचे महाराज आणि एकंदर मराठे यांच्या, वेदमंत्रोक्त धार्मिक विधि करण्याच्या मागणीला विरोध केला. वास्तविक त्रैवणिकांचे सर्व धर्मसंस्कार वेदमंत्राने व्हावे, असें प्राचीन धर्मशास्त्र होतें. एका काळी तर शूद्रांचे संस्कारहि वेदमंत्राने व्हावेत, याला धर्मशास्त्राची मान्यता होती. असे असतांना, वेदांच्या ठायी प्रामाण्य-बुद्धि हें धर्माचें लक्षण ज्यांनी सांगितलें, त्यांनीच वेदोक्त संस्कारांच्या मागणीला विरोध करावा, हें विपरीत वाटतें. कोल्हापूरच्या महाराजांनी त्यांचे उपाध्याय राजोपाध्ये यांनी वेदमंत्रांनी संस्कार करण्याचें नाकारल्यामुळे त्यांचे इनाम जप्त केलें. महाराजांचा हा निर्णय योग्यच होता. ज्यासाठी वतन दिलें तें कार्य तो वतनदार करीना, तर त्याचें वतन जप्त करणें हें न्याय्यच होते; पण टिळकांनी त्यावरहि टीका केली. धर्म हा ऐक्यबंध रूढ करणारा एक चिवट धागा असतो. टिळकांना सर्व हिंदु-समाजांत जूट निर्माण करावयाची होती. अशा स्थितीत मराठ्यांनी वेदोक्त संस्कारांची मागणी केली ही फार मोठी सुसंधि होती. प्राचीन धर्मशास्त्र