पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३०२ । केसरीची त्रिमूर्ति

याला अनुकूल होतें. तेव्हा सर्व ब्राह्मणांनी आनंदाने या मागणीचें स्वागत करावयास हवें होतें; पण सनातन पक्षाने तिला विरोध केला आणि टिळकांनी याहि वेळेस अंध सनातन्यांचाच पक्ष घेतला. ब्राह्मणेतरांच्या मनांत, यामुळे फार कडवटपणा निर्माण होऊन, सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने मोठीच हानि झाली.
धार बोथटली
 या सर्वांमुळे मनाला क्लेश होण्याचें मुख्य कारण हें की, टिळक ही जी एक क्रांतिशक्ति भारतांत निर्माण झाली होती तिला रूढिवादी, सनातनी, अंधपरंपरावादी असें रूप येऊन, सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने, तिंची धार बोथट झाली, तिची प्रखरता लोपली. गणेशोत्सवांत हिंदु-धर्मांतील सर्व जाति, वर्ण, स्पृश्य, अस्पृश्य यांनी एकत्र यावें, असें सांगून व तसें घडलें याचें स्वागत करून, टिळकांनी शेकडो वर्षांची वहिवाट व रूढि मोडली, व यांमुळे विटाळ होतो, असें म्हणणाऱ्या सनातन्यांवर उपहासाने टीका केली. शूद्रांना विद्या द्यावयाची नाही अशी जुनी वहिवाट. तशी शेकडो वर्षे रूढि पडलेली होती व सूत्र-ग्रंथ व स्मृति यांनी तसेंच शास्त्र सांगितले होते; पण राष्ट्रीय शिक्षण सर्व जातींना, वर्णांना, धर्मांना सारखें दिलें पाहिजे, असे प्रतिपादन करून लेख, व्याख्यानें व उत्सव त्यांतून तसें प्रत्यक्ष करून, ती वहिवाट, ती घातक रूढि, व तें धर्मशास्त्र यांना टिळकांनी झुगारून दिलें व राष्ट्रैक्याचा पाया घातला. अस्पृश्यता ही वेदकालीन प्राचीन धर्मशास्त्राला मान्य नव्हती; पण स्मृतींनी ती आग्रहाने सांगितली होती व हजारो वर्षे तशी रूढि होती; पण ती रूढि टिळकांनी मानली नाही. मी अस्पृश्यता पाळीत नाही असें जाहीरपणें सांगितलें तशी कृतीहि अनेक वेळा केली. महर्षि वि. रा. शिंदे यांच्या अस्पृश्यतानिषेधक जाहीर पत्रकावर त्यांनी सही केली नाही याचा आज मोठा गवगवा करण्यांत येतो, पण २ जुलै १९१८ या दिवशीं टिळकांनी शिंदे यांना लिहिलेल्या पत्रांत त्याचा खुलासा केला आहे. "तुमच्या मॅनिफेस्टोच्या शेवटीं कांही कार्यक्रम शिरावर घेऊन तो प्रत्यक्ष अमलांत आणण्याची व्यक्तिशः जबाबदारी त्यांत टाकलेली असल्यामुळे. सध्याच्या माझ्या कार्यव्यापृततेमध्ये हें नवीन कार्य अंगावर घेतां येईल असें वाटत नाही. म्हणून तुमच्या जाहीर पत्रकावर मला सही देतां येत नाही याबद्दल माफ करा", असें त्यांनी म्हटलें आहे. याने टीकाकारांचें समाधान व्हावें असें वाटतें. असो. कोणत्या जातींनी कोणता उद्योगधंदा करावा याविषयी स्मृतिप्रणीत धर्मशास्त्राचे नियम फारच कडक होते; पण लोकमान्यांनी हें धर्मशास्त्र मुळीच न मानतां प्रत्येकाने आपल्याला साधेल तो व्यवसाय करावा, मात्र तो उत्तम करावा, असें वारंवार सांगितलेले आढळते. पिढ्यान् पिढ्या तोच धंदा केल्याने त्यांतील नैपुण्य वाढतें, असें त्यांचें मत असल्याचें दिसतें; पण तेंहि बाजूस सारून व्यवसायबंदीचें शास्त्र त्यांनी त्याज्य मानलें. स्वतःच्या मुलांना सुद्धा, तुम्ही जोडे शिवण्याचा धंदा केलात तरी चालेल, मात्र ते जोडे सर्वोत्कृष्ट झाले पाहिजेत, असें त्यांनी सांगितलें होतें. कोणतीहि