पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लो. टिळक व सामाजिक सुधारणा । ३०३

सुधारणा करतांना ती सयुक्तिक, आवश्यक, व सुकर आहे की नाही एवढाच विचार करावयाचा असतो, असें त्यांनी स्वतःच म्हटलें आहे. हेंच धोरण त्यांनी स्त्री-शिक्षण वेदोक्त, परदेशगमन, सहभोजन, अनेक प्रायश्चित्तविधि या बाबतींत अवलंबिले असतें, तर क्रांतीच्या या शक्तीचें तेज, सामाजिकदृष्ट्याहि. मलिन झालें नसतें.
 लोकमान्यांच्या बाबतींत आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय, हा वाद निर्माणच व्हावयास नको होता, असें मला वाटतें. कारण आधी सामाजिक व धार्मिक सुधारणा झाल्यावांचून राष्ट्रीय तत्त्वावर समाजाचें ऐक्य होणार नाही आणि तसें झालें नाही तर स्वराज्याच्या मागणीला जोर येणार नाही, असें त्यांनी स्वतःच अनेक वेळा सांगितलें आहे व तशी कृतीहि केली आहे. या लेखाच्या प्रारंभीं व आरंभीच्या दोन-तीन लेखांत यासंबंधीचीं त्यांची अनेक वचनें व त्यांनी प्रत्यक्ष कृति केल्याची अनेक उदाहरणें दिलीं आहेत. त्यावरून यासंबंधी संदेहाला कोठे जागा आहे, असें वाटत नाही.
 तरीहि संदेह निर्माण होतो व वाद माजतो याचें कारण हे की, स्वतः टिळकांनीच अनेक ठिकाणीं तसें प्रतिपादन केलें आहे. आधी राजकीय सुधारणा झाल्या पाहिजेत व सामाजिक सुधारणा त्यांच्या मागून सुईमागून दोरा येतो तशा येतील, असे त्यांनी अनेक वेळा म्हटल्याचे आढळतें. आणि हें नुसतें म्हटलें आहे असें नाही तर त्याची कारणमीमांसाहि त्यांनी केली आहे. धार्मिक व सामाजिक सुधारणांचा आग्रह धरला तर समाजांत दुफळी माजेल व स्वराज्याच्या कार्यासाठी, म्हणजे राजकीय सुधारणांसाठी अवश्य ती एकजूट राहणार नाही, असें त्यांचें मत होतें. तसें त्यांनी लिहिलेंहि आहे, आणि आज त्यांचे निकटवर्ती लोक, ही भीति, हें सामाजिक सुधारणांना विरोध करण्याचें मुख्य कारण होतें, तसें त्यांनी आपल्याजवळ म्हटलें होतें असें सांगतातहि. सामाजिक सुधारणा झाल्याखेरीज राजकीय सुधारणा होणार नाही असा आग्रह धरण्यांत कांही अर्थ नाही, असें दोन-तीन ठिकाणी टिळकांनी म्हटलें आहे आणि सर्व सामाजिक सुधारणा ब्रह्मी लोकांत व हिंदुस्थानांतील नेटिव ख्रिस्ती लोकांत झाल्या असूनहि ते समाज आमच्याप्रमाणेच अधोगतीस गेले आहेत, हें उदाहरण दिलें आहे. तेव्हा समाजसुधारणांना टिळकांनी या चर्चेच्या वेळीं तरी गौण स्थान दिलें होतें, हें मान्य केलेच पाहिजे. कांही सुधारणांना अनेक वेळा त्यांनी प्रत्यक्ष विरोध केला होता हें वर दिलेच आहे.
 पण या सर्वांची संगति नीट लागत नाही. सुधारक पक्षाचे लोक इंग्रजांना आपले गुरु मानीत, त्यांचें राज्य म्हणजे ईश्वरी वरदान समजत, आणि सुधारणांचा प्रचार करतांना प्राचीन परंपरेचा जेवढा अभिमान धरावयास हवा तेवढा धरीत नसत, यामुळे टिळकांना त्यांचा फार तिरस्कार वाटत असे. आणि त्यामुळे सुधारकांबरोबर सुधारणांचाहि ते अधिक्षेप करीत एवढेच स्पष्टीकरण फार तर देतां येईल.