पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





-१०-

महाभूतसमाधि


तं वेधा विद्ते नूनं महाभूतसमाधिना ।
तथा हि सर्वे तस्यासन् राष्ट्रार्थैक फलागुणाः ॥

महापुरुषांना घडविण्यासाठी, पंचमहाभूतांचीं मूलकारणें, सृष्टीचीं मूलद्रव्यें ही जी सामग्री विधाता वापरतो तीच वापरून त्याने या महापुरुषाला घडविलें असले पाहिजे. त्यामुळेच राष्ट्राचा उत्कर्ष हें ज्यांचे एकमेव फलं आहे, असेच त्याचे सर्व गुण होते.
 रघुवंशांतील थोर राजा दिलीप याचें कालिदासाने या श्लोकांत वर्णन केलें आहे. त्यांत 'परार्थ' ऐवजी 'राष्ट्रार्थ' असा बदल केला तर तें वर्णन लो. टिळकांच्या बाबतींतहि सार्थ होईल असें वाटतें. हिंदुस्थानचें एक राष्ट्र घडविणें यासाठीच त्यांचा अवतार होता. त्या एका हेतुच्या सिद्धीसाठीच त्यांचे सर्व गुण विधात्याने त्यांना दिले होते.
गुणगौरव
 "प्रखर बुद्धिमत्ता, अचल ध्येयवाद, व्यावहारिक दक्ष-वृत्ति, उदंड उत्साह, भेदक प्रज्ञा, गाढ पांडित्य, साधी राहणी, असामान्य कार्यैक-निष्ठा, अभंग आवेश पण बाह्यतः मात्र शांत वृत्ति, हे मराठा समाजाचे गुण लो. टिळकांच्या ठायी मूर्त झाले होते. त्यामुळे टिळक म्हणजे अतिशय धारदार, तिखट पण म्यान केलेले खड्ग आहे, असे मला नेहमी वाटे," असें महायोगी अरविंद घोष यांनी टिळकांविषयी आपल्या आठवणीत म्हटलें आहे.
 कवयित्री सरोजिनी नायडू म्हणतात, "टिळक हे आपल्या टणक, समृद्ध दगडी महाराष्ट्रांतल्या एखाद्या पहाडासारखे होते. त्याच्या अंगावरून निर्झर