पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाभूतसमाधि । ३२१

प्रथम संरक्षण करून नंतर त्यांची भरभराट झाल्यावर मग तुम्ही म्हणतां त्या तत्त्वज्ञानास प्रारंभ होतो. एरवी हा वेदान्त खोटा आहे व म्हणूनच स्वदेशी चळवळ केल्याखेरीज गत्यंतर नाही." ठेंगडी म्हणतात, "या उपदेशामुळे माझी समजूत पटली व तेव्हापासून मी पूर्ण स्वदेशी बनलों." (आठवणी खंड २ रा, पृ. ४५३).
पाय जमिनीवर
 जागतिक शांतता, सहजीवन, जगांतील कामगारांचें ऐक्य, सत्य, अहिंसा, अलिप्तता, विश्वराष्ट्रवाद, या उदात्त तत्त्वांची जगांत कोणती विटंबना आज होत आहे, हें सर्वांना दिसतच आहे. जे धूर्त आहेत ते मुखाने हीं तत्त्वें सतत उच्चारतात; पण राष्ट्रीय स्वार्थ साधण्याच्या हेतूनेच त्यांचा ते उपयोग करतात. जे अव्यवहारी, स्वप्नमग्न, एकांतिक असतात ते या तत्त्वांमुळे फक्त स्वदेशाचा घात करून घेतात. असे होऊ नये म्हणून टिळक अखंड सावधगिरी बाळगीत प्रतियोगी सहकारितेच्या वादांत, कलकत्त्याचे बॅ. लाहिरी टिळकांशी चर्चा करीत होते. त्यांना प्रतियोगी सहकारिता मान्य नव्हती. तेव्हा टिळक त्यांना म्हणाले, "लाहिरी, राजकारणांतहि तुम्ही व्यवहारी असले पाहिजे. आपली वास्तव परिस्थिति तुम्ही कधी विसरूं नका. उत्साह, भावना या शक्ति नेहमी आपल्या स्वाधीन असल्या पाहिजेत. त्यांच्या आहारी आपण गेलों की घात झालाच. मान सदैव ताठ असावी हें खरें; पण पाय नेहमी जमिनीवरच असले पाहिजेत." लाहिरी म्हणतात, "तेव्हापासून हा उपदेश म्हणजे माझी गीता झाली; आणि सर्व सुशिक्षित व विचारी भारतीयांचीहि तीच गीता होत आहे, असें वाटतें." (आठवणी खंड २ रा, पृ. ६२४).
 दुर्दैवाने लाहिरी यांची ही अपेक्षा खरी ठरली नाही. परराष्ट्रीय राजकारण, हिंदु-मुस्लिम संघर्ष, कम्युनिझम, समाजवाद, राष्ट्रीयीकरण या प्रत्येक बाबतींत आपण अधांतरी चालून आत्मघात करून घेत आहों.
शांत तेज
 देशबंधु दास म्हणतात, "लोकमान्य जन्माने क्रांतिकारक होते काय? मुळीच नाही. उड्डाण, भरारी हें त्यांच्या स्वभावांतच नव्हतें. दृढ, संथ पावले टाकणें, जें अल्प मिळेल तें खिशांत टाकून पुढच्यासाठी लढत राहणें, ध्येयावरची दृष्टि अचल राखून सतत तडजोडीला, समेटाला तयार असणें ही त्यांची वृत्ति होती. तुटत्या ताऱ्याची झगझग, किंवा विजेचा क्षणभरचा लखलखाट हें त्यांच्या चरित्रांत नाही. स्वयंप्रभ ताऱ्याप्रमाणे त्यांचें तेज शांत होते. ते जनतेंतून वर आले होते; आणि अखेरपर्यंत जनतेच्या बरोबर राहून तिच्या चालीनेच ते चालत राहिले. त्यामुळे त्यांचें पाऊल पडे तें निर्भयपणें व दृढनिश्चयाने पडे; आणि मग तें पाऊल प्राणांतीहि मागे घेत नसत. गीतारहस्याचा हा कर्ता कर्मयोगी होता व अखंड, अविरत कर्म हें त्याचे ब्रीदवाक्य होतें." (चित्तरंजन दास - आठवण, (सारार्थ), खंड २ रा, पृ. ६२२).

 के. त्रि. २१