पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३२६ । केसरीची त्रिमूर्ति

ज्ञाननिष्ठा
 टिळकांचा व्यासंग फार मोठा होता, अगाध होता, असें म्हणणें म्हणजे सूर्याच्या ठायीं तेज आहे, प्रकाश आहे, असें सांगण्यासारखेच आहे; पण तरीहि सूर्याचें स्तोत्र आपण गातों, तसेंच टिळकांच्या व्यासंगाचें थोडें वर्णन करण्यास हरकत नाही. वेद, उपनिषदें, महाभारत, रामायण, स्मृति, कालिदास, भवभूति- ही संस्कृत सरस्वती तर त्यांच्या जिव्हेवर अखंड नाचत होतीच; पण आपले प्रतिपादन अर्वाचीन पद्धतीने, बुद्धीला पटवून देण्याच्या हेतूने, त्यांना करावयाचे असल्यामुळे पाश्चात्त्य विद्येतील तत्त्वज्ञान व भौतिकशास्त्रे त्यांनी आत्मसात् करून टाकली होती. गीतारहस्य लिहितांना सर्व भारतीय तत्त्ववेत्ते व संत यांच्याबरोबरच प्लेटो, ॲरिस्टॉटल यांच्यापासून कांट, शोपेनहार, बेथाम, मिल्ल, ग्रीन हे सर्व तत्त्ववेत्ते व डाल्टन, डार्विन, हेकेल, हे शास्त्रज्ञ यांच्या ग्रंथांचा सखोल अभ्यास त्यांनी केला व त्या पायावर गीतारहस्यांतील सिद्धान्तांची उभारणी केली. 'मृगशीर्ष' व 'आर्यांचें मूलस्थान' या ग्रंथांसाठी त्यांना भूगोल, खगोल, पुरातत्त्व, पदार्थविज्ञान, गणित हीं सर्व शास्त्रे सूक्ष्मपणें अभ्यासावीं लागलीं. हें त्यांच्या जगविख्यात ग्रंथांविषयी झाले. त्यांचे केसरींतील लेख हें त्या मानाने स्फुट लेखन होतें. तें प्रासंगिक वृत्तपत्रीय लेखन होतें, पण तेंहि लेखन ज्ञानपरिपूरित असेंच आहे. त्यांना राजकीय विषयांवर लिहावयाचें होतें, इंग्रज सरकारविरुद्ध लिहावयाचें होतें; पण त्यांना प्रचारकी लेखन करावयाचें नव्हतें. तर नवें राजकीय तत्त्वज्ञान या देशाला सांगून राष्ट्रीयत्व व लोकशाही यांचा पाया घालावयाचा होता. त्यामुळे हे लेखहि त्यांनी शास्त्रीय पद्धतीने व्यासंग करूनच लिहिले. बहिष्कार हा विषय येतांच इटली, चीन, अमेरिका यांनी परकी मालावर बहिष्कार घालून आक्रमकांना कसें नमविलें हा सर्व इतिहास ते सांगतात. उद्योगधंदे, कारखाने, कापड, सूत यांच्या गिरण्या हा विषय मांडतांना वेदकाळापासून भारतांत उद्योगधंद्याची काय स्थिति होती, पाश्चात्त्य देशांत काय होती, त्यांच्या मागचे अर्थशास्त्रीय सिद्धान्त वारंवार कसे बदलत गेले, हें सांगून इंग्रजी राज्यामुळे या देशाला दारिद्र्य व अवकळा आलेली आहे, हा आपला सिद्धान्त ते मांडतात. स्थानिक स्वराज्य, ज्यूरीची पद्धति, प्लेगचे इनॉक्युलेशन- कोणताहि विषय असूं द्या. त्या त्या विषयाच्या शास्त्रज्ञांना नसेल इतकी माहिती टिळक जमा करीत; आणि बिनतोड युक्तिवाद करून प्रतिपक्षाला नामोहरम करीत. टिळकांच्या नंतर भारतीय राजकारणांत व्यासंगाची, ज्ञानष्ठेिची ही परंपरा लुप्त झाली हें दुर्दैव होय.
खंडन-मंडन
 अगाध व्यासंगाप्रमाणेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्या लेखनांत आविष्कृत होणारा दुसरा गुणविशेष म्हणजे त्यांचे खंडन-मंडन-कौशल्य आणि युक्तिवाद-नैपुण्य. 'मिल्ल आणि मोर्ले' 'अध्यक्षांचे अधिकार', 'हिंदी स्वराज्य संघ' यांसारख्या लेखांत हें नैपुण्य अगदी टिपेस गेलेलें दिसतें. मोर्ले हे त्या वेळचे स्टेट सेक्रेटरी. त्यांनी 'हिंदु-