महाभूतसमाधि । ३२९
पिण्डेष्वनास्था
लोकमान्यांचे उपमा- दृष्टान्त असे प्रायः अगदी प्राकृत, गद्य व व्यवहारी असतात. बाह्योपचारांच्या बाबतींत ते स्वतः अगदी रूक्ष व कठोर असत. डोक्याला त्यांनी कधी कोणाकडून तेलहि लावून घेतलें नाही. पत्नीकडून सुद्धा. आपलें सर्व जीवन जणू त्यांनी अग्निज्वाळेवर कायम धरलेलें होतें. "एकान्तविध्वंसिषु मद्विधानां पिण्डेष्बनास्था खलु भौतिकेषु" (नाशवंत अशा या जड देहावर माझ्यासारख्यांची मुळीच आसक्ति नसते) अशी दिलीप राजाप्रमाणेच त्यांची वृत्ति होती. हीच त्यांची वृत्ति आपल्या तात्त्विक सिद्धान्ताचा देह म्हणजे जी भाषा तिच्याविषयी होती असें दिसतें. महाभारत हा या बाबतींत त्यांचा आदर्श असावा. महाभारतांत साहित्यसौंदर्य निर्माण करण्याचा प्रयत्न दिसत नाही. कालिदास- भवभूति या अभिजातपंथीय कवींच्याप्रमाणे तर नाहीच, पण रामायणासारखा सुद्धा नाही. मानवी जीवनाचा आशय सांगावा, त्यावर भाष्य करावें, त्याचें तत्त्वज्ञान सांगावें, आणि अज्ञानतिमिराने अंध होऊन चाचपडत चालणाऱ्या लोकांच्या डोळ्यांना ज्ञानांजनाने दृष्टि द्यावी, त्यांच्या नेत्रांचें उन्मीलन करावें हें आपलें उद्दिष्ट असल्याचें वेद व्यासांनी सांगितलें आहे. लो. टिळकांचे तेंच उद्दिष्ट होतें. म्हणून भाषेच्या शृंगाराचा हव्यास त्यांनी धरला नाही.
गंगौघ
लो. टिळकांनी अनेक अर्वाचीन पाश्चात्त्य विद्यांचा अभ्यास केला. शेकडो युरोपीय पंडितांचे ग्रंथ चाळले, पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर वा लेखनावर त्यांचा प्रभाव पडला नाही. विष्णुशास्त्री यांच्या लेखणीवरचा मेकॉले, जॉन्सन यांचा व ग्रीक-रोमन इतिहासाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. आगरकरांचे मिल्ल, स्पेन्सर, कोंट हे आदर्श पंडित होते; पण टिळकांच्या मनावर प्रभाव होता तो वेद, उपनिषदें, महाभारत, रामायण, कालिदास, भवभूति, भर्तृहरि यांचा. सर्व पाश्चात्त्य विद्या त्यांना करतलामलकवत् होत्या. त्यांनी त्या पूर्ण आत्मसात् केल्या होत्या. त्यांचें सर्व राजकीय व आर्थिक तत्त्वज्ञान त्यांवरच उभें होतें. पण त्यांच्या मनांत त्यांचें रसायन झाल्यावर त्याचा जो आविष्कार होत असे, तो गंगोत्रींतून झाल्यासारखा दिसे; आणि तो सर्व ओघ गंगौघासारखा वाटे.
पूर्वसूरींची वाणी
लोकांना त्यांना जो उपदेश करावयाचा होता तो सर्व ते या पूर्वसूरींच्या वाणींतून, वचनांतून करीत. आपण जर एकजूट केली, संघशक्ति निर्माण केली, तर इंग्रज- सरकारला आपल्याला वठणीवर आणतां येईल हें सांगतांना "तृणैरावेष्टयते रज्जुः यथा नागोपि बध्यते ।" हें वचन त्यांनी दिले आहे. तृणाची जूट होऊन दोरी झाली की त्याच तृणांनी हत्ती देखील बांधला जातो. स्वदेशी- बहिष्काराच्या चळवळीला