३३० । केसरीची त्रिमूर्ति
त्यांनी 'बहिष्कारयोग' असें नांव दिलें होतें. म्हणजे हा एक धर्म आहे, असे त्यांना सांगावयाचें होतें. आणि कर्मयोगाचें अल्प आचरण जरी केलें तरी त्याचें जसें मोठें फल मिळतें तसेंच या धर्माचें आहे, हा भावार्थ "स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ।" या गीतावचनाने त्यांनी सांगितला आहे. सरकाशी लढा करतांना फाशी, हद्दपारीहि सोसावी लागली तरी सोसावी हा विचार ते व्यास मुखांतून सांगतात. यदि समरमपास्य नास्ति मृत्योः भयमिति युक्तमितोन्यतः प्रयातुम् । अथ मरणमवश्यमेव जंतोः किमिति वृथा मलिनं यशः कुरुध्व । युद्ध टाळून मृत्यु चुकत असेल तर पळून जाणें युक्त ठरेल, पण मृत्यु कधी टळत नाही. मग उगीच नांवाला कलंक का लावून घेतां? भिक्षा मागणें, रडणें किंवा इतरांच्या धर्म-बुद्धीवर अवलंबून राहणें, याने राजकीय कामे होत नसतात; तर तीं ज्याने त्याने आपल्या तेजानेच साध्य केली पाहिजेत, ही नीति राष्ट्रीय सभेस सांगण्याची आता वेळ आली आहे, असें म्हणून 'राष्ट्रीय सभेच्या कामाची दिशा' या लेखांत टिळकांनी वनपर्वांतील भीमाच्या तोंडचे "न चार्यो भैक्ष्यचर्येण... यतस्व पुरुषर्षभ" हे दोन श्लोक उद्धृत केले आहेत. डेक्कन कॉलेजचे प्रिन्सिपॉल सेल्बी यांनी, विद्यार्थ्यांनी स्वदेशीच्या चळवळींत पडूं नये, असा उपदेश चालविला होता. त्या वेळीं 'हे आमचे गुरूच नव्हत' असा प्रहार टिळकांनी केला होता, हें प्रसिद्धच आहे. "गर्वाने फुगून गेलेला, कार्याकार्य न जाणणारा, आणि दुर्मार्गाने जाणारा असा गुरु असेल तर त्याचा त्याग करणेच योग्य." या व्यास-वचनाचा आधार त्यांनी त्या वेळीं घेतला होता. होमरूलची चळवळ दडपून टाकण्यासाठी सरकारने बेझंटबाईंना अटक केली; पण त्यामुळे चळवळ उलट जास्तच फोफावली. सरकारने विष म्हणून दिलें, पण त्याचें अमृत झालें. "विषमप्यमृतं क्वचिद् भवेद् अमृतं वा विषमीश्वरेच्छया", असें कालिदासाने म्हटलेच आहे. शिवरामपंत परांजपे यांच्या 'काळ' पत्रांत फार राजद्रोही लेख येतात, अशी चहाडी मुंबईच्या 'टाइम्स'ने सरकारकडे केली. तेव्हा शिवरामपंतांची बाजू घेऊन टिळकांनी 'मराठी काळ व इंग्रजी काळ' हा प्रसिद्ध लेख लिहिला. त्यांत टाइम्स व त्यासारखे चहाडखोर लोक यांवर भर्तृहरीच्या श्लोकांच्या आधारे टिळकांनी कडक टीका केली आणि असले 'नृपांगणगतः खल' न्यायाच्या केरसुणीने अंगणांतून झाडून काढून अंगण साफ करावें, अशी सरकारला विनंती केली. ही गोष्ट १९०६ सालची. तेव्हा टिळकांनी 'विनंती' हा शब्द वापरला. पुढे १९१७ साली गव्हर्नर विलिंग्डन यांनी लष्करभरतीसाठी सभा बोलावली. त्या सभेंत टिळकांनी सांगितले की, "स्वराज्य व स्वदेश-संरक्षण यांची साखळी आम्हांला तोडतां येणार नाही" हे वाक्य उच्चारतांच गव्हर्नर- साहेबांनी त्यांच्या भाषणास बंदी केली. तेव्हा "अशा परिस्थितींत परिषद् सोडून जाण्याखेरीज कोणाहि स्वाभिमानी माणसास दुसरा मार्ग नाही" असें म्हणून टिळक सभा सोडून निघून गेले; आणि दुसऱ्या दिवशी केसरीमध्ये 'मय्यप्यास्था न चेत् त्वयि मम सुतराम्, एष राजन् गतोऽस्मि' ('हे राजा तुला माझी परवा नसेल तर