पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिंहावलोकन । ३३५

सर्वस्वत्याग
 अशा तऱ्हेच्या स्वावलंबनामागोमाग ध्येयासाठी सर्वस्वत्याग हा ओघानेच येतो. तो अपरिहार्यच असतो. असा त्याग करण्याची अगदी नवी परंपरा या देशांत केसरीच्या त्रिमूर्तीनेच निर्माण केली. त्या आधीचे नेते थोर होते, ज्ञाते होते; पण त्यांची देशसेवा फावल्या वेळांतली होती. आपापली नोकरी-व्यवसाय संभाळून ते देशसेवा करीत. तेंहि कार्य फार मोठें होतें यांत शंका नाही. पण स्वराज्य-स्वातंत्र्य हें ध्येय तेवढ्याने साधणे कधीच शक्य नव्हते. एवढेच नव्हे तर सरकारशीं विरोध येताच ती देशसेवाहि संपुष्टांत येत असे. काँग्रेसची सेवा की सरकारची सेवा- म्हणजे नोकरी– असा प्रश्न उभा राहताच त्या पुरुषांनी सरकारची सेवा ठेवली व कांग्रेस सोडून दिली; आणि विष्णुशास्त्री यांनी नोकरी सोडून राष्ट्रसेवेचें व्रत घेतलें. आधीचे नेते व त्रिमूर्ति यांच्यांत हा फार मोठा फरक होता.
 राजकारणासाठी तुरुंगवास पत्करावयाचा ही वृत्तीच या देशांत पूर्वी नव्हती. कोल्हापूरच्या वर्गांचें प्रकरण उद्भवलें आणि आगरकर-टिळक यांच्यावर खटला झाला. तेव्हा, हा घरचें खाऊन लष्करच्या भाकरी भाजण्याचा उद्योग या लोकांना कोणी सांगितला होता, असेंच लोक म्हणू लागले. १९८७ साली टिळकांच्यावर राजद्रोहाचा पहिला खटला झाला त्या वेळी त्यांना लोक असाच सल्ला देऊं लागले. हा नसता उद्योग कशाला? राष्ट्राचें कार्य हें आपले कार्य ही भावना येथे अभावानेच कशी होती हे त्यावरून दिसून येईल. येथे सर्व प्रजाजन होते, लोक अजून नागरिक झाले नव्हते हाच याचा अर्थ आहे. स्वराज्याची चळवळ हा त्यांना नसता उद्योग वाटत होता. अशा या समाजांतून त्रिमूर्तीला राष्ट्र निर्माण करावयाचें होतें. म्हणूनच राष्ट्रासाठी सर्वस्वत्याग, अंतीं प्राणत्यागहि, केला पाहिजे ही वृत्ति त्यांनी स्वतःच्या उदाहरणानेच निर्माण केली. विष्णुशास्त्री एक पाय तुरुंगांत ठेवूनच नेहमी लिहीत असत. आगरकर त्याच वृत्तीचे होते. त्यांना अकाली मृत्यु आला यामुळे त्यांच्यावर तुरुंगवासाचा प्रसंग आला नाही. नाही तर टिळकांच्या प्रमाणेच त्यांच्यावरहि राजद्रोहाचे खटले झाले असते यांत शंका नाही. त्यांच्या राजकीय व आर्थिक विषयांवरच्या लेखांचे स्वरूप तसेंच होते. टिळकांनी सर्वस्व त्याग कसा केला याचें सविस्तर वर्णन करण्याची गरजच नाही. मागे सांगितल्याप्रमाणे कालपुरुषाची चेष्टा करीतच ते आपले राजकारण चालवीत होते. पुढे सत्याग्रहाच्या व असहकारितेच्या चळवळींत हजारो, लाखो लोक तुरुंगांत गेले त्यांना ही नागरिकत्वाची प्रेरणा या त्रिमूर्तीच्या त्यागाच्या परंपरेंतूनच मिळाली होती.
राष्ट्रीय अहंकार
 राष्ट्रीय अहंकाराचा परिपोष हें त्रिमूर्तीच्या कार्याचें तिसरें वैशिष्ट्य होय. प्राचीन परंपरेचा तीव्र अभिमान जागृत करून या अहंकाराचा परिपोष त्यांनी केला. त्रिमूर्तीच्या आधीच्या नेत्यांना भारताच्या प्राचीन परंपरेचा अभिमान नव्हता असें