पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३३६ । केसरीची त्रिमूर्ति

नाही. पण सर्वस्वार्पणास सिद्ध होण्याची प्रेरणा देण्याइतका तो प्रखर नव्हता, आणि असणें शक्यहि नव्हतें. इंग्रजांना ते गुरु मानीत, त्यांचें राज्य म्हणजे परमेश्वरी योजना अशी श्रद्धा ते जोपाशीत. तेव्हा त्यांचा हा अभिमान कांही झालें तरी राष्ट्रीय अहंकाराच्या परिपोषाला अवश्य तितका तेजस्वी असणें शक्यच नव्हतें. विष्णुशास्त्री यांनी नवयुग निर्माण केलें तें त्या अभिमानाचा निखारा फुलवून केलें. साधी स्वभाषेची गोष्ट पाहा. त्यांच्या आधीच्या थोर नेत्यांनी आपले सर्व वक्तृत्व व लेखन इंग्रजीत केलें. मराठी भाषेचा विकास आणि राष्ट्रीयत्वाचा विकास यांत अद्वैतसंबंध आहे, हे त्यांनी मानले नाही. त्यांतल्या कांहींनी मराठीत लेखनहि केलें. नाही असें नाही; पण मराठींत वाग्वैभव निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्नहि केला नाही. तीच गोष्ट स्वधर्माची. त्यांनाहि धर्माभिमान होता; पण मिशनऱ्यांना वैरी मानावें, त्यांना शत्रु लेखावें व त्यांचा पाडावा करावा हें धोरण त्यांनी अंगीकारलें नाही. उलट त्यांनाहि ते गुरुस्थानी मानीत. आणि आपल्या पूजा-प्रार्थना ख्रिस्ती वळणावर नेत. यामुळे जनतेच्या अस्मितेला तेज चढण्याऐवजी ती म्लानच होत असे. आमच्या धर्मांत दोष नाहीत, असें त्रिमूर्तीपैकी कोणीच म्हणत नसे. अनेक धार्मिक रूढींवर त्या सर्वांनी विष्णुशास्त्री व टिळक यांनी सुद्धा- टीका केली आहे. पण दादोबा पांडुरंग, लोकहितवादी यांनी केलेली टीका व ही टीका यांत महदंतर होते. त्रिमूर्तीच्या टीकेत स्वत्व-जागृतीचें अवधान असें. आगरकरांनी हिंदु धर्मावर अति कडक टीका केली. पण ती सर्व आचारधर्मावर, तत्त्वज्ञानावर नव्हे. प्राचीन परंपरेच्या अभिमान्यांवरहि त्यांनी टीका केली; पण स्वतः कर्तृत्वशून्य राहून नुसती तशी वटवट करणाऱ्यांवर ती टीका होती. या दृष्टीने पाहिलें तर आगरकरांना विष्णुशास्त्री व टिळक यांच्याइतकाच स्वत्वाभिमान होता असे दिसून येईल. फरक पडत असे तो आवेशांत आणि भर देण्यांत.
 नागरिकत्वाच्या गुणांची जोपासना करूनहि सर्व नागरिकांच्या ठायीं राष्ट्रीय अहंकाराचा पोष झाला नसता तर ते गुण निर्माल्यवत् झाले असते. राष्ट्रीय अस्मितेचें हें महत्त्व त्रिमूर्तीने बरोबर जाणलें होतें म्हणूनच त्या ध्रुवताऱ्यावरून त्यांनी आपलें लक्ष केव्हाहि विचलित होऊं दिलें नाही.
मूळ गाभा एकच
 राष्ट्रनिर्मितीसाठी ह्या तीन थोर पुरुषांनी जें तत्त्वज्ञान सिद्ध केलें होतें. त्या विषयी त्यांच्यांत फारसे मतभेद नव्हतें. त्यांच्यांत भेद होते ते अग्रक्रमाविषयी होते, कमीजास्त भर कशावर द्यावयाचा याविषयी होते; आणि प्रत्येकाचा आपापले प्रतिपादन करण्याचा आवेश भिन्न होता; पण राष्ट्रनिर्मितीचे जे मूलसिद्धान्त, त्यांचा जो गाभा त्याविषयी त्यांच्यांत मतभेद नव्हते.
 निवृत्तीमुळे या देशाचा अधःपात झाला असून प्रवृत्तिवाचून त्याचा उत्कर्ष साधणार नाही याविषयी त्रिमूर्तीपैकी कोणालाच शंका नव्हती. संपत्ति, षड्रिपु