३३८ । केसरीची त्रिमूर्ति
या राजकीय कार्यात सर्व सामाजिक सुधारणांचा पाया घातला जातो, हें आपल्याला मान्य होईल. जातिभेद, अस्पृश्यता, विषमता, स्त्री-दास्य या रूढींची पाळेंमुळे समाज-मनांत फार खोल जाऊन रूतून बसलेली होती. तीं खणून काढण्यासाठी नुसतें तार्किक प्रतिपादन पुरे पडणार नाही, असें टिळकांचें मत होतें. समाजापुढे कांही फार मोठें सामुदायिक ध्येय ठेवलें व त्या ध्येयाच्या आड या रूढि येत आहेत, हें समाजाला दाखविलें तर या रूढींचा त्याग करणें अवश्य आहे हें त्याला पटेल व मग सामाजिक सुधारणा करण्यास अवश्य तें मानसिक सामर्थ्य त्याला प्राप्त होईल, असा त्यांचा हिशेब होता. आणि यासाठीच स्वराज्य हें उदात्त ध्येय डोळयांपुढे ठेवून त्यासाठी चालू केलेल्या स्वदेशी- बहिष्कारादि चळवळींत समाजाला सामील करून घ्यावयाचें असे धोरण त्यांनी आखलें होतें. महाभारतांत म्हटलें आहे की, हत्तीच्या पावलांत सर्व इतर प्राण्यांच्या पावलांचा समावेश होतो त्याचप्रमाणे राजधर्मांत सर्व धर्मांचा समावेश होतो. टिळकांचें हेंच तत्त्व होतें. राजकीय सुधारणा करतां करतांच त्यांतूनच, सामाजिक सुधारणेस अवश्य ती मानसिक शक्ति समाजाला लाभेल, अशी त्यांची निश्चित होती.
अगोदर जगणें
मौज अशी की, राजकीय सुधारणांचें महत्त्व जास्त आहे, त्यांनाच अग्रस्थान दिले पाहिजे हा विचार टिळकांच्याइतक्याच आग्रहाने व निःसंदिग्धपणे आगारकरांनी.'फेरजमाबंदी व लष्करी खर्च' या 'सुधारकां'तील लेखांत मांडला आहे. ते म्हणतात, "जशा सामाजिक सुधारणा अवश्य आहेत तशा राजकीय सुधारणाहि अवश्य आहेत. किंबहुना सामाजिक सुधारणापेक्षाहि राजकीय सुधारणा विशेष आवश्यक आहेत, म्हणून राजकीय सुधारणा सामाजिक सुधारणांच्या आधी झाल्या पाहिजेत." या लेखांत एवढेच सांगून आगरकर थांबले नाहीत. सरकार सामाजिक सुधारणांचे महत्त्व जास्त आहे, असें सांगून आमची फसवणूक करीत आहे, अशी टीकाहि त्यांनी केली आहे. यानंतर राजकीय सुधारणांचे महत्त्व पुन्हा विशद करतांना ते म्हणतात, "अगोदर जगणें आणि मग चांगल्या रीतीने जगणें. चैतन्य रक्षण झाल्यावांचून तें (जीवन) सुखाने घालवितां येणें अशक्य आहे. विशिष्ट प्रकारच्या राजकीय व्यवस्था समाजाच्या अस्तित्वाला आवश्यक आहेत. म्हणजे त्या नसल्या तर समाजाची वाताहात होते. सामाजिक सुधारणांची गोष्ट तशी नाही. त्या समाजास शोभा देतात, किंवा विशिष्ट प्रकारचा आनंद निर्माण करतात. तेव्हा त्या मागून झाल्या तरी चालतील. जातिभेद, बालविवाह, असंतम वैधव्य, केशवपन, वगैरे दुष्ट चालीपासून आम्हांस पुष्कळ त्रास होत आहे. पण मिठावरील कर, रेव्हिन्यू सर्व्हेचा फेरा, लष्करी खातें, यांपासून जो त्रास होत आहे त्यापुढे वरील त्रास कांहीच नाही म्हटलें तरी चालेल. आजच्या व पुढच्या विधवांचे वैधव्य-दुःख एकत्र केलें तरी साठ लक्ष मनुष्यें अन्नान्न