पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आत्मप्रत्यय । १९

होत्या. म्हणजे त्यांचा लढा, जोतिबांप्रमाणे तात्त्विक नव्हता. त्याला नैतिक अधिष्ठान नव्हते. इंग्रज राज्यकर्त्यांच्या बाबतींत तर, 'पंचम जॉर्ज पिता व मेरी आमची माता' असें म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. स्वातंत्र्यानंतर पंचवीस वर्षे ब्राह्मणेतरांच्या हाती सत्ता आहे. या काळांत शूद्र-अस्पृश्य यांवरचे अत्याचार, जोतिबांच्या काळाप्रमाणेच चालू आहेत. नव्हे, त्यांचे प्रमाण फार वाढलें आहे. ज्या शेतकऱ्यांसाठी जोतिबांनी कणाकणाने देह झिजविला तो शेतकरी, ते शूद्र, ते अस्पृश्य, ते आदिवासी, ते दलित यांची स्थिति पूर्वीपेक्षाहि जास्त दयनीय झाली आहे. आणि भाई माधवराव बागल, डॉ. बाबा आढाव, केशवराव मोरे रा. ना. चव्हाण हे ब्राह्मणेतर कार्यकर्तेच हे सांगत आहेत. सत्यशोधक समाज म. फुले यांचे तत्त्वज्ञान मुळीच मानीत नाही, हें अनेक उदाहरणे देऊन त्यांनी स्पष्ट केलें आहे. ('साधना', पुणे - अंक १५-५-७१, ९–१०–७१, ११-३-७२ वं २४-६--७२). म. फुले यांचा खरा अनुयायी एकच- महर्षि वि. रा. शिंदे. पण ते अंत्यज सेवा करतात म्हणून बहुजनांनी त्यांना बहिष्कृत केलें. याचा अर्थ हा की, ब्राह्मणेतर समाजाने म. फुले यांच्यापासून स्फूर्ति घेतली नाही. आपले उद्धारकर्ते आपण आहोत, ही भावना प्रारंभापासून त्यांच्यांत चेतली असती तर त्या सामाजिक, धार्मिक लक्ष्यांतूनहि स्वत्वजागृति बहुजनांच्या ठायी झाली असती, व त्यांच्यांतूनहि अपार कर्तृत्व निर्माण झालें असतें. १९३० सालानंतर तो समाज स्वातंत्र्यलढ्यांत उतरल्यानंतरच तो शुभारंभ झाला.
 पण पितामह दादाभाई, न्या. मू. रानडे व लोकहितवादी यांच्यासारखे जें 'माहितीचे समुद्र' त्यांनी सुद्धा इंग्रज राज्यकर्ते हेच आपले उद्धारकर्ते ही भूमिका स्वीकारली तेथे महात्मा फुले यांना कसा दोष द्यावयाचा?
 याचा अर्थ एकच. इंग्रज गेले तरी हिंदुस्थानचे भवितव्य आपण आपल्या खांद्यावर सहज पेलूं शकूं, असा आत्मप्रत्यय या थोर पुरुषांच्या ठायीं नव्हता. विष्णुशास्त्री, आगरकर, टिळक यांचें वैशिष्ट्य हे की, त्यांचे मन या आत्मप्रत्ययाने ओतप्रोत भरलें होतें, दुथडी वाहत होतें. यामुळेच विष्णुशास्त्री यांनी बेधडक सांगून टाकलें की, इंग्रज इकडे आले नसते तर आपले कांही अहित झालें असतें असें नाही. इतकेंच नव्हे, तर या जगांत इंग्रज मुळीच नसते तरी त्यांच्यावांचून आम्ही रसातळास जाऊन पोचलों असतों, असें नाही. ('आमच्या देशाची स्थिति'- य. गो. जोशी प्रकाशन, पृ. २९, २४).