पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८० । केसरीची त्रिमूर्ति

आणि शेवटी रस, कल्पना, सृष्टि-वर्णन इत्यादि गुणांची उदाहरणें म्हणून त्या त्या कवीच्या काव्यांतील विपुल उतारे दिले आहेत.
 पाश्चात्त्य पद्धति ती हीच. काव्यसौंदर्याचें असें शास्त्रशुद्ध विश्लेषण पौर्वात्य साहित्यशास्त्रांत कोठेहि आढळत नाही. मूळ कथानकाशी कवीच्या कथानकाची तुलना करून त्याने केलेल्या फेरफारांची चिकित्सा करणें, हें तर आपल्या साहित्य- शास्त्रकारांच्या स्वप्नांतहि कधी आलें नव्हतें. पाश्चात्त्य कवींच्या काव्य-नाटकांशी आपल्या कवींच्या काव्य-नाटकांची तुलना ही तर त्यांना शक्यच नव्हती. कारण पाश्चात्त्य जगाच्या अस्तित्वाचीच त्यांना जाणीव नव्हती; पण दुर्दैव असे की, येथल्या कवींची परस्परांशी चिकित्सक दृष्टीने तुलना, जी सहज शक्य होती, तीहि त्यांनी केली नाही; पण तुलना सहज शक्य होती असें म्हटलें हेंच चूक आहे. स्वतंत्र बुद्धीने कशाची चिकित्सा करण्याचे, काव्यांचीच नव्हे, जीवनांतील कोणत्याहि गोष्टीची चिकित्सा करण्याचें, सामर्थ्यच भारतीय मनाला राहिलेलें नव्हतें.
 आपल्या लोकांना विचार करण्याची सवय नाही, त्यांना काव्य म्हणजे काय तें कळत नाही, त्यांच्या ठायीं रसिकता नाही, असें जें विष्णुशास्त्री यांनी ठायीं ठायीं म्हटलें आहे त्याचा हाच भावार्थ आहे. कालिदास असो, भवभूति असो, दंडी असो, सुबंधु असो. त्या जुन्या लोकांना सर्व कवि सारखेच वाटत. या मूढ वृत्तीचाहि विष्णुशास्त्री पुनः पुन्हा निषेध करतात. हे टीकालेख लिहिण्यांत त्यांचा काय हेतु होता, हे यावरून ध्यानांत येईल.
सर्व कवि समकालीन
 प्रत्येक कवीचा स्थल-काल- निश्चय करण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला आहे त्यामागलाहि हेतु हाच आहे. जुन्या लोकांना सर्वं कवि सारखे, तसे सर्व काळहि सारखेच होते. ज्ञानेश्वर आणि मोरया गोसावी, शिवछत्रपति आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटी घडविण्यांत बखरकारांनाहि कांही वावगे वाटत नसे. मग भक्तिभावाने काव्य वाचणाऱ्या लोकांची कथा काय? कालिदास आणि भवभूति हे समकालीन होते यावर त्यांची अढळ श्रद्धा होती. भवभूतीच्या विवेचनाच्या प्रारंभी हे दोन कवि समकालीन असणें शक्य नाही, असा निर्णय देऊन विष्णुशास्त्री म्हणतात. "वरील वाद आमच्या वाचकांस बहुधा रुचणार नाही. त्या मनोवेधक आख्यायिकेच्या विरुद्ध जीं प्रमाणे वर दाखविलीं तीं वाचून त्यांचा फार हिरमोड होईल; पण या गोष्टीस इलाज नाही. या जगांत सत्यत्व व मनोहारित्व या गुणांचें साहचर्य नेहमीच आढळतें असें नाही!"
 सर्व कवींची काव्यें सारखींच रम्य आणि सर्व कवि समकालीन! यांमुळे आणखीहि एक गोंधळ माजतो. या कवीचें काव्य त्याच्या नांवावर व त्या कवीचें आणखी तिसऱ्याच्या नांवावर हा प्रकार मागे सर्रहा चालू होता. 'नलोदय' नांवाचें एक अगदी अधम काव्य कालिदासाच्या नांवावर पूर्वकाळीं खपत होतें. याविषयी