पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

टीकाकार विष्णुशास्त्री । ८१

लिहितांना शास्त्रीबुवा म्हणतात, "पुष्कळ सामान्य प्रतीचे व कित्येक अप्रयोजक ग्रंथहि कालिदासाच्या नांवावर मोडत आले आहेत, आणि पूर्वीच्या पंडितांत शोधकता मुळीच नसल्यामुळे ते सर्व त्याच्या मोठ्या नांवावर आजपर्यंत खपलेहि गेले! कालिदासाच्या कवित्वाची ज्यास यत्किचित तरी ओळख आहे त्यास वरील 'नलोदय' या क्लिष्ट काव्याच्या कर्तृत्वाविषयी बिलकुल संशय राहणार नाही. संस्कृत कवींच्या कुलगुरूची प्रसन्न व सरस वाणी कोणीकडे आणि हें हठ-कवित्व कोणीकडे!'
 आणि तरीहि जुन्या शास्त्रीपंडितांना हा भेद जाणवत नव्हता!
इतिहास अभाव
 या सर्व घोटाळयाचें कारण काय? आपल्याकडचा इतिहास-लेखनाचा अभाव! पुढे निबंधमालेत 'इतिहास' या निबंधांत हें आपल्या प्राचीन संस्कृतीचें मोठें व्यंग्य होय असें विष्णुशास्त्री यांनी म्हटलें आहे. पणं त्याच्याहि आधी तीन- चार वर्षे, हा विचार त्यांच्या मनांत येत होता असें दिसतें. 'संस्कृत कविपंचकां'त त्यांनी तीन-चार ठिकाणी तो सांगून त्याविषयी मोठा खेद व्यक्त केला आहे. बाणभट्टाविषयी प्रास्ताविक लिहितांना ते म्हणतात, "ज्याप्रमाणे गाढ अंधकारांत रंगरूप, आकारमान, अंतर इत्यादिकांचीं भानें सर्व नष्ट होतात, त्याप्रमाणे एक इतिहासाशिवाय आमच्या साऱ्या ग्रंथसमूहभर गोंधळ माजला आहे. कोणता आधी, कोणता मागून, कोणत्याचा कसा प्रसंग होता इत्यादि गोष्टी समजण्याची मनास मोठी उत्कंठा वाटते!...याप्रमाणे आपल्या देशाचा पुरातन इतिहास नसल्यामुळे आपली व एकंदर जगाचीहि मोठी हानि झाली आहे." याच निबंधांत पुढे त्यांनी म्हटलें आहे, आपल्या लोकांत पूर्वीपासून एक मोठी गैदी चाल पडलीशी दिसते. ती ही की, शक म्हणून लिहावयाचा नाही. प्रस्तुत प्रसंगी एक मोठी चमत्काराची व अंमळ लज्जेची गोष्ट आमच्या वाचकांस कळविणें आहे. ती ही की, बाणकवि केव्हा झाला याविषयीची आपली उत्कंठा, जी आपले स्वतःचे ग्रंथ तृप्त करण्यास समर्थ झाले नाहीत ती एका चिनी ग्रंथाने सहज तृप्त केली. (तो ग्रंथ म्हणजे हुएनसंगाचा ग्रंथ).
 संस्कृत कविपंचकांत कालक्रम आणि भूगोल यांचे महत्त्व अनेक ठिकाणीं विष्णुशास्त्री यांनी सांगितलें आहे, आणि कवींनी स्वतःची माहिती लिहून ठेविली नाही. लोकांनी त्यांची चरित्रे लिहिली नाहीत आणि इतिहास-लेखन केलें नाही म्हणून वारंवार खेद व्यक्त केला आहे. यावरून, लोकांत रसिकता निर्माण करावी हा जसा या लेखनामागे हेतु होता तसाच युरोपांतील चौदाव्या-पंधराव्या शतकाप्रमाणे येथे प्रबोधन घडवावें हेंहि त्यांचे उद्दिष्ट होतें, हें स्पष्ट होतें.
परखड टीका
 'ग्रंथावर टीका' या निबंधांत गुणांप्रमाणे दोषांचेंहि विवरण करण्यास हरकत नाही असें विष्णुशास्त्री यांनी सांगितले. तें या ग्रंथांत त्यांनी आचरूनहि
 के. त्रि. ६