पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/९९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८२ । केसरीची त्रिमूर्ति

दाखविलें आहे. सुबंधु या कवीच्या 'वासवदत्ता' या कथेवर त्यांनी अगदी परखड टीका केली आहे; आणि त्यांतील कथानक असंभाव्य, तर्कहीन, विसंगत असून खऱ्या रसिकास आनंद देण्यासारखें त्यांत कांही नाही, असा निर्णय दिला आहे. 'दंडीच्या दशकुमार चरिता' विषयी जवळपास असाच अभिप्राय त्यांनी दिला आहे.
 'टेंपेस्ट' व 'सिबेलाइन-तारा' या दोन नाटकांची मराठीत भाषांतरे झालीं होतीं. त्यांवर विष्णुशास्त्री यांनी जे अभिप्राय दिले तेहि पाश्चात्त्य टीकापद्धतीचा अवलंब करूनच लिहिले आहेत. मनुष्यस्वभावाची माहितगारी, भावना, यथापात्र भाषा, वातावरण या गुणांचा गौरव करून कण्वांच्या आश्रमांत वाढलेली शकुंतला व निर्जन बेटावर वाढलेली मिरांदा यांची मोठी हृद्य तुलना त्यांनी केली आहे. सिबेलाईन हें नाटक शास्त्रीबुवांना आवडलें नाही. त्यावर अभिप्राय देतांना त्यांनी मूळ शेक्सपियरच्या कथानकावरहि टीका करण्यास कमी केलें नाही. "शेक्सपियरच्या नाटकांत पाहतां प्रस्तुत गुण-संविधानकाच्या रचनेचा- प्रायः पूर्णपणे आढळत नाही. कथासूत्रांत गुंतागुंत झालेली दृष्टीस पडते, व कोठे कोठे असंबंधत्वहि नजरेस येतें. प्रस्तुत नाटकांतील कथानक मौजेचें असलें तरी त्यांत अनेक प्रकारचे दोष आहेत," असें ते म्हणतात.
 आता विष्णुशास्त्री यांच्या टीका वाङ्मयापैकी एक मोठा प्रबंध तेवढा राहिला. तो म्हणजे मोरोपंताची कविता हा होय. हा प्रबंध खूपच मोठा आहे. तरी साहित्य-समीक्षेच्या दृष्टीने त्याचा फारसा विचार करण्याचें कारण नाही. कारण त्यांत साहित्य-सौंदर्यापेक्षा इतर अवांतर गोष्टींचीच चर्चा फार आहे, तेव्हा त्याचा परामर्श अगदी थोडक्यांत करणेंच युक्त ठरेल.
मोरोपंत
 प्रस्तुत प्रबंधांतील मुख्य प्रश्न 'कवि ही संज्ञा मोरोपंतास लावतां येईल की नाही?' असा आहे; आणि ही संज्ञा त्याला पूर्णपणे लागू पडेल, असें त्याचें उत्तर विष्णुशास्त्री यांनी दिलें आहे; पण असें उत्तर त्यांनी दिले असले तरी कालिदास, भवभूति यांच्या काव्यांचे विवेचन करतांना, रस, कल्पनाशक्ति, मनुष्य- स्वभावाचें ज्ञान, मनाचे व्यापार, सृष्टि, यांचें वर्णन, स्वभाव- लेखन इत्यादि काव्यगुणांची उदाहरणे देऊन जसें त्यांनी सौंदर्यदर्शन घडविलें आहे तसें या विशाल प्रबंधांत कोठेहि घडविलेले नाही. कांही रसभरित प्रसंगांचा एका ठिकाणी फक्त निर्देश केला आहे. मग इतर गुणांचें काय? शेवटच्या लेखांत शास्त्रीबुवांनी स्पष्ट म्हटलें आहे की, "आमच्या महाराष्ट्र कवींनी सामान्यतः पाहतां अर्थव्यंजनाच्या पलीकडे थोडेंच लक्ष दिलेलें आढळते. अर्थ शब्दांनी व्यक्त झाला म्हणजे झालें. मग शब्दांच्या ठाकठिकीकडे किंवा सौंदर्याकडे लक्ष पुरवावयाचें नाही, असा त्यांचा प्रघात आढळतो! ज्याने संस्कृत किंवा इंग्रजी कवितेचें रूप पाहिलें असेल त्यास प्रस्तुत कवीच्या ठायीं पदलालित्य, माधुर्य, प्रसाद इत्यादि गुण असावे तसे नाहीत हे