पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/39

हे पान प्रमाणित केलेले आहे.



सहा

 


 जिवाची पहिली गरज कोणती? अर्थातच जीवन! माणूस किंवा कोणताही मानवी समुदाय जे काही भले-बुरे करतो, ते जिवंत राहिला तरच. दोष, चुका, कुप्रथा कोणत्या समुदायात नाहीत? काही दोष, कुप्रथा पिढ्यानपिढ्या डोक्यावर थापलेल्या तर काही अगतिकतेमुळे स्वीकारलेल्या. ही अगतिकताही बऱ्याच वेळा जगण्याशी, जिवंत राहण्याशी संबंधित असते... हौदात पाणी वाढल्यावर स्वतः बुडू नये म्हणून पिलाला पायाखाली घेणाऱ्या माकडिणीसारखी! जवळपास दवाखाना नसेल तर साप चावलेल्या माणसाला देवळात नेलं जातं त्यात अंधश्रद्धा किती आणि अगतिकता किती? आपल्याला एका अत्यंत अपरिचित जनसमुदायात जाऊन काम करायचंय, हे जेव्हा उमगलं तेव्हाच ही बाजूही परिस्थितीनंच लक्षात आणून दिली. शिरूर कासार तालुक्यात मुलींसाठी, बायकांसाठी काम करायचं ठरवलं, अभ्यास आणि मोर्चेबांधणी सुरू केली, तेव्हाच एका विशिष्ट समाजघटकाचा विचार न करता संपूर्ण समाजाचा, त्यांच्या जीवनशैलीचा, मानसिकतेचा आणि अगतिकतेचा साकल्यानं विचार करायला हवा, हे वास्तव आम्हाला खुद्द निसर्गानंच सांगितलं.

३५