पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/5

हे पान प्रमाणित केलेले आहे.
एक

 




 मंगल मंगल हो .... गाडीतल्या डेकवर मंगल पांडे चित्रपटातलं गाणं वाजत होतं आणि हाती घेतलेल्या कामात सगळं काही मंगल व्हावं, असं गाडीतल्या प्रत्येकाला मनापासून वाटत होतं. लाल रंगाची ट्रॅक्स होती त्यावेळी. पहाडी आवाजात गाताना डफावर सफाईदारपणे हात चालवणा-या कैलासचं ड्रायव्हिंगसुद्धा तितकंच सफाईदार. गाडीत माझ्यासोबत शैलाताई, माया, बबलू आणि अवघडलेल्या अवस्थेतली कविता. खरं तर आज संजीवच्या प्रमोशनची पार्टी, नवरा विभागप्रमुख झाल्याच्या आनंदात असायला हवं होतं मी. आनंद होताच; पण आखलेल्या मोहिमेची धाकधूक पार्टीत मन रमू देत नव्हती. पार्टी संपल्यावर आमच्यापैकी कुणीच घरी गेलं नाही. सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच टार्गेट होतं आणि ते गाठणं फारसं सोपं नाही, याची सुज्ञ जाणीवही होती. मुक्कामापुरते कपडेलत्ते आणि जुजबी साहित्य इकडून-तिकडून जमा करून आम्ही स्टार्टर मारला, तेव्हा संध्याकाळचे सात वाजून गेले होते. अजिबात ठाऊक नसलेल्या रस्त्यावरून प्रवास सुरू केला, तोही अंधार दाटून येत असताना...
 

 काम नवीन नव्हतं. यापूर्वी सहा वेळा अशा मोहिमा फत्ते केल्या होत्या. प्रत्येकाला आपापलं काम ठाऊक होतं. पण ज्या भागात निघालो होतो, तिथल्या परिस्थितीची, लोकांच्या मानसिक जडणघडणीची,सामाजिक-आर्थिक रचनेची कसलीच माहिती कुणालाच नव्हती. “आमच्या भागात तर उघडउघड चालतं," असं अशरोबा गोरे सहज बोलून गेला होता आणि त्याचे शब्द तंतोतंत खरेही ठरले होते. आमचा हा कार्यकर्ता केज तालुक्यातला. बीड जिल्ह्याची खडान्खडा माहिती