पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/69

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 गावगावात जे काम आपण सुरु केलंय, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल की विरोध होईल, याची खात्री नव्हती. परंतु सुरुवातीला हे आशांचं नियमित काम आहे, असंच गावकऱ्यांना वाटत होतं. त्यामुळं वेगळं काही चाललंय याची कल्पना त्यांना आलीच नव्हती. पण एखादा बालविवाह ठरला, तर त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचत होती. तेवढं जाळं विणलं गेलं होतं. नंतर अनोळखी व्यक्तीही फोन करुन माहिती देऊ लागल्या. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या सरकारी योजनेचाच हा भाग असेल, असंही काहींना वाटलं असण्याची शक्यता आहे. पण पोलीसात तक्रार होते, हे लक्षात आल्यामुळे बालविवाहाविषयी नकळत एक भय लोकांच्या मनात निर्माण झालं. मुलींचं नकळत जे संघटन होत होतं, त्यात सोसले पणाचा किती दारुगोळा भरलाय, याची कुणालाच कल्पना नव्हती. ही ताकद दिसली ती १८ डिसेंबर २०१६ रोजी शिरूर कासारला झालेल्या युवती मेळाव्यातच! सिंदफणा युवती मेळावा, असं नाव मेळाव्याला देण्यात आलं. सिंदफणा ही शिरूर कासार तालुक्याच्या बहुतांश भागाला स्पर्श करून वाहणारी नदी. त्याच वर्षी सिंदफणा नदीला कधी नव्हे तो पूर आला होता. तालुक्यात समाधान होतं. तालुक्याच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नदीच्या नावाने मेळावा जाहीर झाला तोच मुळात खुलेपणानं लढाई सुरू करण्याचे रणशिंग फुंकण्यासाठी. त्याच वेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मेळाव्याला येण्यासाठी उत्सुकता दर्शवली. पण, या व्यासपीठावर राजकारण येऊ द्यायचं नाही, म्हणून मी ठाम नकार दिला. शिवाय, अनेक वर्षे राज्य महिला आयोग अस्तित्वातच नव्हता म्हणून आम्ही समांतर महिला लोकआयोग सुरू केला होता. मग विजया रहाटकर यांनी युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडशी (यूएनएफपीए) संपर्क साधला. तिकडून आम्हाला विचारणा झाली, तेव्हाही आम्ही आमच्या मतावर ठाम राहिलो. राजकारणाला प्रवेश बंद! मग आम्हाला मिळणारा निधी बंद झाला तरी चालेल, हा निर्धार!

 शिरूर कासारचा युवती मेळावा हा आमच्या वाटचालीतला मैलाचा दगड ठरला. सुमारे २५०० मुली येतील, असा आमचा अंदाज होता. त्यानुसार मांडव घालण्यापासून सगळी तयारी सुरू केली. आम्ही आदल्या दिवशी साताऱ्याहून शिरूरला गेलो. मांडव बघितला. एवढ्या आकाराच्या मांडवात किती लोक बसू शकतात, याचाही अंदाज आम्हाला नव्हता. दीड-दोन हजार मुली निश्चित बसतील, असं मांडववाल्यानं सांगितलं. मुलींसाठी शिरा, पुरी आणि बटाट्याची भाजी असा बेत ठरवला. या मेनूची तयार पाकिटं बीडमधून मागवली होती.

६५