पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/72

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मानसिक बदलांची माहिती पालक आणि मुलींना मिळाली पाहिजे, किशोरावस्थेत मुलींना आवश्यक आरोग्य आणि पोषणसुविधा मिळाल्या पाहिजेत, मुलींना शिक्षण पूर्ण करता यावं, यासाठी माध्यमिक शाळांची संख्या पुरेशी हवी, शाळेला जाण्यासाठी बस आणि अन्य वाहनसुविधा मिळायला हव्यात, गरजू मुलींना निवासी आणि सुरक्षित वसतिगृहाची सुविधा मिळाली पाहिजे, ऊसतोड मजुरांच्या मुलींना समाजकल्याण विभागातर्फे चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहात प्रवेश दिला पाहिजे, मुलींना संरक्षण देणाऱ्या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे, शाळांसह इतर सार्वजनिक ठिकाणी मुलींसाठी सुरक्षित वातावरण पुरवले जाईल याची खात्री पालकांना पटायला हवी, बालविवाह थांबवण्यासाठी जनजागृती केली जावी, मुलींना रोजगाराभिमुख कौशल्यविकास प्रशिक्षण दिले जावे, अशा मागण्यांची ही सनद या भरगच्च मेळाव्यात सार्वजनिक करण्यात आली.

 या यशस्वी मेळाव्यानंतरही एक महत्त्वाचं काम उरलं होतं. बीड जिल्ह्यातल्या अधिकृत यंत्रणा जिल्ह्यात बालविवाह होतात, हे मान्यच करायला तयार नव्हत्या. कागदोपत्री काहीच नव्हतं. परंतु वस्तुस्थिती काय आहे, हे विभागीय आयुक्तांपर्यंत पोहोचवणं आवश्यक होतं. शिवाय, आमच्या आग्रही भूमिकेमुळे मेळाव्याला येऊ न शकलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनाही वस्तुस्थिती माहीत असणं गरजेचं वाटलं. शिरूर कासार तालुक्यातच बालविधवा होत्या, बाल परित्यक्ता होत्या. त्यामुळे चौदाव्या वर्षी वैधव्य आलेली मुलगी, सोळाव्या वर्षी मातृत्व लादली गेलेली मुलगी, लहान वयात सोडून दिलेली मुलगी अशा सगळ्यांना घेऊन आम्ही जानेवारी २०१७ च्या पहिल्या आठवड्यात औरंगाबाद गाठलं. सोबत पथनाट्याचा ग्रुप होताच. विभागीय आयुक्तांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांंसह सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांंना बोलावून घेतलं होतं. अधिकारी धास्तावले होते. सगळ्यांसमोर मुलींनी पुन्हा एकदा बेधडकपणे पथनाट्य सादर केलं. तितक्याच रोखठोक भाषेत त्यांनी आपल्या व्यथाही मांडल्या. आपल्याकडे अजूनही लग्न हेच मुलींच्या जीवनाचं अंतिम ध्येय असल्यासारखं वातावरण आहे. तेच जर अजाणत्या वयात झालं आणि पुढे काही समस्या उभ्या राहिल्या, तर तिचं संपूर्ण जीवन कसं मातीमोल होऊन जातं, याची मूर्तिमंत उदाहरणं अधिकाऱ्यांंसमोर उभी होती. एका मुलीला केवळ तीन वर्षांचं वैवाहिक आयुष्य लाभलेलं. नवरा मुलगा गावातलाच. पेशानं ड्रायव्हर. पण लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांत त्याचं निधन झालं. त्याचा तेरावा झाल्यानंतर तिला वडिलांनी माहेरी

६८