पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/97

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मराठवाड्यातलं तर समाजकारण आणि राजकारणही याच मंडळींच्या जिवावर चालतं. त्यामुळे मराठवाड्यातल्या नेत्यांनी या मजुरांविषयी ठोस भूमिका घेऊन रिंगणात उतरायला हवं. ऊसतोड मजूर ही महाराष्ट्रातली सद्यघडीची सर्वात मोठी वेठबिगारी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मराठवाड्याला मागं ठेवून महाराष्ट्र पुढे जाऊ शकणार नाही. चिमण्या मुलींसाठी या कष्टकऱ्यांंच्या घरात डोकावलं मी; पण आत जे दिसलं ते भयाण आहे. सुखवस्तू घरातली माणसं कल्पनाही करू शकणार नाहीत, की असं जीवन जगणाराही एक 'माणूस' आहे. कदाचित इतके उन्हाळे-पावसाळे पाहून ऊसतोड मजूर स्वतःच बहुतेक हे विसरला असावा. माझा निश्चय आहे, माझ्या सहकाऱ्यांंच्या जोडीनं मी त्याला त्याच्यातला माणूस दाखवेन. त्याच्या घराला घरपण देण्यासाठी शक्य ते करेन. सहृदयी नागरिक आणि संवेदनशील सरकारी अधिकाऱ्यांंनी याकामी मला, माझ्या कार्यकर्त्यांना बळ द्यावं असं आवाहन करते आणि थांबते! जय श्रमदेवी!!

९३