पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/125

हे पान प्रमाणित केलेले आहे.

घेतल्यानं वर्गरचना, फर्निचर, यात अडकलेलं आपलं शिक्षण सैल करून भिंतीबाहेरची शाळा साकारत लीलाताई सामूहिक वाढदिवस अनाथ मुलांबरोबर साजरा करण्याचा घाट घालतात. त्याला विजय तेंडूलकरांसारखा संवदनशील पाहुणा बोलवतात. डोळ्यांची आरती उतारतात. (इथं ही प्रयोग!). त्यामुळे शिक्षणाचं पर्यावरण एकदम समाज संवेदी होऊन जातं! अपंगांच्या वेदना, अंधांची धडपड (खरं तर तडफड!) ही त्या अभिनव पद्धतीनं समजावतात. 'पाणी' साक्षरतेचा त्यांचा प्रयोग असाच पर्यावरणाची भावसाक्षरता वाढवणारा. त्यामुळे सृजनच आनंद विद्यालयाचे शिक्षण जिवंत होते.
 विद्यार्थ्यांना जे द्यायचे ते सकस, त्याचा शिक्षण गुणांक (Percentage) वाढवणारं ते नसतं. गुणवत्ता (Quality and Excellence) वृद्धी त्यांचं लक्ष्य असतं. ती उत्तर ओकण्याच्या क्षमतेवर न जोखता तुम्हाला कळालेलं स्वतःच्या भाषेत स्वतःच्या पद्धतीनं कसं सांगता ती खरी गुणवत्ता. मुलखावेगळं उत्तर देणारी मुलं लीलाताईंना भावतात. म्हणून सृजनचे विद्यार्थी स्वप्रज्ञ! ते नाटकासाठी तयार संहिता नाकारतात व स्वतः नाटक लिहितात. चौथीतल्या मुलांत निर्माण झालेला हा आत्मविश्वास सृजनची आनंददायी व्यक्तिविकासाची किमया असते. एकविसाव्या शतकातील शिक्षण हे व्यक्तिविकास केंद्री असलं पाहिजे असा जागर आज सर्वत्र ऐकण्यास मिळतो. पण लीलाताईंनी हा गजर २५ वर्षांपूर्वी लावला होता, हे लक्षात घेतले की त्यांच्या दूरदृष्टीचा अचंबा वाटल्यावाचून रहात नाही.

 सृजन आनंद विद्यालयाची ही प्रायोगिक धडपड हा सामूहिक आविष्कार असला तरी त्यातली लीलाताईंची मानसिक गुंतवणूक कॅटॅलिक एजंटची भूमिका बजावणारी होती. गेली सतत २५ वर्षे त्या बालहक्क म्हणून बालशिक्षणाचा विषय लावून धरतात. त्यामागे भारताचं बाल्य समृद्ध नि संपन्न करण्याचा ध्यास आहे नि नवा भारत स्वप्रज्ञ करण्याची तळमळही! जीवनाचे सहस्रदर्शन झालेल्या लीलाताई या वयातही तरुणास लाजवेल अशा समर्पणाने कार्य करतात.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१२४