पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/155

हे पान प्रमाणित केलेले आहे.

बी. बी. पाटील यांनी कोल्हापुरात दिगंबर जैन बोर्ड, जैन श्रविकाश्रम, प्रगती आणि जीनविजय साप्ताहिक, देशभूषण प्रेस अशा अनेक मार्गांनी जैन समाजाच्या अर्थबळाचा वापर येथील जनसामान्यांच्या कल्याणासाठी घडवून आणला. येथील आचार्य रत्न देशभूषण शिक्षण मंडळामार्फत चालविल्या जाणाच्या बालवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय, महावीर महाविद्यालय, धर्मभारती, विद्यानंद सांस्कृतिक भवन हे सारं बी. बी. पाटील यांच्या सतत २७ वर्षांच्या अविरत परिश्रमाचं सामाजिक फलित होय. त्यांच्या या कार्यामुळे जैन समाजाचे ते ‘भूषण' ठरले हे आपणास विसरता येणार नाही.
 स्वातंत्र्योत्तर कालखंडात महाराष्ट्राला प्रभावित करणारी दोन आंदोलनं लक्ष्यवेधी ठरली. एक संयुक्त महाराष्ट्राचा लढा तर दुसरा गोवा मुक्ती संग्राम! या दोन्ही लढ्यातं बी. बी. पाटील यांनी कुशल संघटकाचे कार्य केले.
 राजकारण, शिक्षण, समाजसेवा, धर्मसंघटन, पत्रकारिता ही त्यांच्या जीवनकार्याची पंचसूत्री म्हणून सांगता येतील.

 रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे सल्लागार म्हणून ते अनेक दशके कार्यरत आहेत. कोल्हापुरात शाहू कॉलेज व महावीर कॉलेज ही धर्मनिरपक्षे सामाजिक विद्या केंद्रे म्हणून लोकमान्य झाली. त्यांचे श्रेय बी. बी. पाटील यांनी पेरलेल्या समाजविचारांनाच द्यावे लागले. त्यांचे आत्मकथन आत्मश्लाघेसाठी नाही. असेलच तर त्यात समाजशिक्षणाचा भाव आहे. बी.बी.पाटील यांनी व्यक्तिगत जीवनात शेती व उद्योगाची सांगड घालत समृद्धी निर्माण केली.संसार स्वकष्टानी व स्वधनावर करायचा. सामाजिक कार्य पूर्ण पणे संघटना शक्तीच्या जोरावर.त्यामुळे त्यांनी जोपासलेल्या संस्था आज उर्जितावस्थेत आहेत. बी. बी. पाटील यांचं द्रष्टेपण त्यांच्या संस्थांच्या स्थैर्यपूर्ण विस्तार व विकासात दिसून येतं. सचोटी व निष्ठा या मूल्यांवर ते मोठे झाले. धर्म हे समाज संघटनांचं साधन बनवून त्यांनी शिक्षण साध्य समाज निर्मितीचं स्वप्न बाळगलं होतं. आज ते यशस्वी झालेलं पाहतो. हे त्यांच्या आयुष्याचं यश होय.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१५४