पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/159

हे पान प्रमाणित केलेले आहे.

माईसाहेब बावडेकर हुजूर स्वारी म्हणून कधीकाळी दुकानात यायच्या. गाडीत बसलेल्या असायच्या. ताई बापू त्यांना दुकानातनू कधी गाडीत तर वाड्यावर साड्या दाखवायला जायचे. एक जहागीरदार बाई आपल्याकडे मदत मागते... एखादा माणूस सुखावला असता. ताई माईसाहेबांना म्हणाल्या, "तुम्ही राणीसाहेब; मागायचं नाही, हुकूम द्यायचा. मी जिवंत असताना तुम्ही कोणाकडे मागायला जायचं नाही." ताईंनी पाच लक्ष रुपयांचे साहाय्य देवू केलं. पुढं माईसाहेब त्यांच्यापेक्षा खानदानी निघाल्या. तुमच्या पैशांतून शाळा झाली तर त्याला नाव तुमचंच हवं म्हणून हटून बसल्या. एक साध्वी तर दुसरी माधवी असा सामाजिक समसमासंबंध आज किती दुर्मीळ आहे ना! ताईंच्या घरी नोकर-चाकरांची रेलचेल असायची. दुकानात नोकरांचा राबता असायचा. सगळ्यांच्या घरकार्यात ताईंचा आहेर ठरलेला. आपण तूप खातो, गरिबास तेल तर मिळावं म्हणून ताईंची होणारी तगमग मी जवळून अनुभवली आहे. वरकरणी कठोर वाटणाऱ्या ताईंमध्ये एक मृदू व्यवहारीपण भरलेलं असायचं. त्यांचं घर म्हणजे सतत नातलगांची उठबस असलेलं गलबत. ताईंना आल्यागेल्याचं करण्याची मोठी हौस. आतिथ्य, स्वागत, सत्कार, मानपान, आहेर-माहेर यातून ताईंनी भारतीय संस्कृतीचे उमदेपण मनस्वी जपलं होतं. गेली काही वर्षे त्या अबोल होत्या. विशेषतः बापूंचा जाण्यानंतर याचं अबोल होणं म्हणजे एका पतिव्रतेनं स्वीकारलेली सामाजिक सल्लेखनाच होती. बापूंच्या निधनानंतर या वालावलकर ट्रस्टच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या कार्यकाळात वालावलकर कापड दुकान ट्रस्टने व्यापाराच्या क्षेत्रात ‘पेशवाई ड्रेस मटेरियल'सारखी नवी दालनं उघडली नि काळाला साद घालत आपलं नवपण जपलं.
 नलिनीताई वालावलकर म्हणजे काळाच्या पुढे पाहणारी एक महत्त्वाकांक्षी मानिनी! स्त्रीविकासाच्या ज्यांना पाऊलखुणा शोधायच्या असतील त्यांनी या लक्ष्मीपावलांच्या खुणा अभ्यासायला हव्यात. तेव्हा कळेल की शिक्षणाचं खरं रूप शहाणपण असतं. ते शाळेत मिळत नाही. ते मिळतं माणूस व्यवहारात, जीवनाच्या अनुभवात.त्यासाठी आयुष्यभर स्थितप्रज्ञ राहून कर्मपूजा करत राहावी लागते.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१५८