पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/164

हे पान प्रमाणित केलेले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलक : के. डी. खुर्द

 कलाकार जन्माला यायला लागतो तसा समाजसेवकही. समाजसेवक अनेक प्रकारचे असतात. दृश्य नि अदृश्य. के. डी. खुर्द हे अदृश्य, भूमिगत समाजसेवक. समाज विसंगती, विषमता, वर्तन विरोध, अंधश्रद्धा, अज्ञान अशा कितीतरी गोष्टी शासकीय सेवेत बेचैन करत असतात. तसे के. डी. खुर्द हे शासकीय सेवेत शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्य करत राहिले. पण शासकीय सेवेचा काच त्यांनी स्वतःस कधी स्पशू दिला नाही. मी संपर्कात आलेला माणूस शासकीय सेवेत असेल तर लगेच ओळखतो. के. डी. खुर्द मला सेवेत असतानाही कधी शासकीय वाटले नाहीत. ते समाजसेवक म्हणून जसे जन्मसिद्ध तसे ते जन्मसिद्ध अशासकीय व्यक्ती. मला वाटतं, माणसाला जन्मतः अशासकीय व्यक्तिमत्त्व लाभणं मोठं वरदान. शिक्षण, समाजसेवा, अंधश्रद्धा निर्मूलन, देवदासी प्रथा विरोधादी कार्यात त्यांनी केलेलं योगदान शासकीय सेवेत आल्यापासूनच आहे हे जेव्हा मी पाहतो तेव्हा मला अचंबा वाटतो नि हेवाही? मला या रहस्याचा उलगडा नाही होत की शासकीय व्यक्ती उदार मनाची, सहयोगी, मार्गदर्शक, मदतनीस, सहकारी, समाजसेवी असूच कशी शकते? पण नियम अपवादाने सिद्ध होतो म्हणतात. के. डी. खुर्द हे अनेकांगी अपवाद व्यक्तिमत्त्व!
 के. डी. खुर्दीचा जन्म २ सप्टेंबर, १९३४ चा. घरची गरिबी. शिंपी हा वडिलोपार्जित धंदा. मलकापूरसारख्या आडवळणी गावात बाजारादिवशी चाळीस खण विकायचे नि तेवढ्याच चोळ्या बाजार उठायच्या पूर्वी शिवून देण्याचं कसब के.डी.खुर्दच करू जाणे. गिनिज बुकवाल्यांना त्यांचा त्या वेळी परिचय कसा झाला नाही याचं आश्चर्य वाटतं.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१६३