पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/169

हे पान प्रमाणित केलेले आहे.

ग्राहक हितरक्षक : प्रा. श्रीश भांडारी

 फायदा करून घेण्यासाठी कोण नाही धडपडत ? व्यापारी अनेक युक्त्या योजून फायदा कमावतात. वस्तू चांगली व स्वस्त मिळाली म्हणून ग्राहक आटापिटा करीत असतो, पण ग्राहकाच्या डोळ्यात धूळ फेकून लाभ कमावणे अनैतिक तसचे फसवणूक ही! अलीकडे फसवणूक हेच व्यापारी तंत्र होऊ पाहात आहे. लोकांचे अज्ञान हाच आमचा फायदा असं गृहीत मूळ धरू पाहात असताना ग्राहकांना सज्ञान करणं, त्यांना त्यांची हक्काची जाणीव करून देणं, व्यापारी, व्यवसायातील लुबाडणूक, फसवणुकीचे शंभर मार्ग शोधून काढणं, ते सर्वसामान्यांना समजावणं हे आधुनिक काळातील अत्यावश्यक, सामाजिक, वैज्ञानिक व व्यवहारी प्रबोधन होय. प्राध्यापक श्रीश भांडारी यांनी गेली १५ वर्षे जीवनकार्य म्हणनू उराशी कवटाळलं. जीवघेणे कष्ट घेतले या माणसान अन् त्या कष्टानचं त्याचा जीव घेतला म्हणायचा. अन्यथा, काल-परवापर्यंत बैठकीत असलेला हा सन्मित्र असा अचानक जावा हे केवळ अकल्पित. अवघी पन्नाशीपण या गड्यानं ओलांडली नाही. त्याआधीच यानं काळाचा उंबरठा ओलांडावा खरंच नाही वाटत!

 प्रा. भांडारी यांच्या ग्राहक हितरक्षण, ग्राहक हक्क जागृती, ग्राहक प्रबोधन, ग्राहक हक्क संरक्षण यांचं महत्त्व मला विशषेत्वाने पटते, ते शहाणी सुरती, शिकली सवरलेली, अगदी उच्च विद्याविभूषित माणसं ही सध्या साध्या कारणांसाठी डुबतात, फसतात, तोंडघशी पडतात, हे जेव्हा स्टाफरूममध्ये त्यांच्या शेजारी बसून ग्राहकांच्या कैफियती मी ऐकत आलो, तेव्हा लक्षात येत गेलं.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१६८