पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/177

हे पान प्रमाणित केलेले आहे.

बांधिलकीवर वरिष्ठ वकील, कधी-कधी न्यायाधीश खुष व्हायचे. वकील हा बुद्धिजीवी वर्ग. त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून तळागाळातील वर्गाबद्दल काही केलं पाहिजे असं त्याला वाटायचं. तो आपल्या तरूण वकील मित्रांवर कधी-कधी तोंडसुख घ्यायचा. त्याच्याच धडपडीतून 'प्रोग्रेसिव्ह लॉयर्स असोसिएशन' जन्माला आली. संस्था, मंच, पेढी, मंडळ स्थापायचं पण हा नामानिराळा राहायचा. पडद्यामागे राहून कष्ट उपसण्याचा जणू त्याला छंदच जडून गेला होता.

 दोन ऑक्टोबरला त्याचा बालमित्र नि माझा सहकारी मानसपुत्र मिलिंद यादवचा रात्री दहाला फोन आला... सर अवीला अॅटक आलाय्... ताबडतोब या...' धो-धो पावसात मी आधार नर्सिंग होम गाठलं... कॉरिडॉरमध्येच कॉम्रेड दिलीप पोवारांनी मोबाईल हाती दिला. .. पुण्याहून अनंत दीक्षित बोलत होते... तुम्हीच सगळं सांभाळा... अवी इज नो मोअर... मी सकाळी पोहोचतोय... डॉक्टर दामलेंशी बोलून घेतलं... हळूहळू सांगत गेलो... आवार हंबरड्यांनी धुमसू लागलं... कॉम्रेड गोविंद पानसरेंनी मात्र छातीवर दगड ठेवला...' अशा वेळी समजुतीनंच घ्यायचं असतं' म्हणत ते आम्हासच समजावत राहिले... मग आम्ही बळेच त्यांना घरी पाठवून रात्रभर अवीशी संगत करून राहिलो... पहाटे अविला घरी घेऊन गेल्यावर मात्र पित्याचा मायेचा पाझर, पान्हा मलाही हुंदका देऊन गेला. सकाळी तर सारं जग अविमय होतं... आता अवी नव्हता... होत्या एकेक स्मृती... नव श्रम संस्कृतीचा अलख जागवणारा हा योद्धा,उद्गाता... ज्यानं ऐन तारुण्यात लाल बावटा आपल्या खांद्यावर मिरवला... त्यातच तो लपेटून पडलेला राहिला... सर्वांनी त्याला अखेरचा लाल सलाम दिला खरा... पण पित्यानं आपल्या पुत्राला वाहिलेली श्रद्धांजली त्याला अमर करून गेली...अवी का अधुरा काम कौन करेगा?... “हम करेंगे'... हम करेंगे'ची त्या दिवशीची ललकार, आरोळी हवेत विरणारी नव्हती. न्यायाच्या वाटेनं निघालेल्या या प्रवाशाला दिलेलं ते आश्वासन होतं... सहवेदना होती... दुनिया के रंज सहना और कुछ मुँह से न कहना सच्चाइयों के बल पे आगे को बढते रहना...

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१७६