पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/57

हे पान प्रमाणित केलेले आहे.

दिवस कंठणे कठीण झाले, तरी दत्तक गावाहून सांगावा काही येईना. महिना उलटून गेल्यावर दत्तक आई व बहिणीचा निर्वाणीचा निरोप आला. नाणेलीस खांडेकरांचे जाणे आगीतून फुफाट्यात जाण्यासारखेच होते. पण दत्तक बहीण वारणा आक्काच्या मायेने सारे निभावून जाऊ लागले. तिच्या ‘भाऊ पुकारणीनं पोरकेपण सरलं व जिणं सुसह्य होत गेलं.
 इच्छेविरुद्ध जगणं, विचार करणं, मन न लागणं या सर्वांची परिणती हिवतापात झाली आणि खांडेकर पुरते गारद झाले. नाणेलीच्या वास्तव्यात इथल दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा इत्यादी गोष्टीही धक्का देणाऱ्या ठरल्या. पुण्याच्या वास्तव्यात थोरामोठ्यांचे सान्निध्य, सहवास लाभल्याने सुधारक मनास हे सारं नवं होतं. खेड्याचं हे दर्शन विकल करणारं होतं. दारिद्र्यातही चातुर्वर्ण्य आहे. किंबहुना चातुर्वर्ण्यापलीकडचा पंचम वर्ग आहे' या जाणिवेने ते सतत अस्वस्थ असत.
 थोडे बरे वाटताच राहिलेली टर्म पूर्ण करण्याकरिता म्हणून खांडेकर परत पुण्यात आले. पण प्रकृती अस्वास्थ्याने त्यांना परतणे भाग पडले. १९१७,१८ ही दोन वर्षे प्रकृतीच्या कुरबुरीतच गेली. या काळात बांबुळी येथे खांडेकरांचा मुक्काम होता. सोबत दत्तक बहिणीची सावली होती. प्रकृतीस उतार पडावा म्हणून येथील ब्रह्मेश्वर मंदिरात व्रत-वैकल्ये, अनुष्ठाने होत. खांडेकरांचा त्यावर विश्वास नव्हता. केवळ घरच्यांच्या मायेपोटी ते सारे निमूट सहन करीत. १९१८ सरता सरता प्रकृतीत बराच फरक पडला.

 सन १९१९ वर्ष उजाडलं पण खांडेकरांचा आराध्य सूर्य मावळला. २३ जानेवारीला राम गणेश गडकरी यांचं दुःखद निधन झालं. खांडेकरांच्या आयुष्यातली पोकळी रोज या ना त्या कारणाने वाढतच निघाली होती. वेळ घालवण्यासाठी परिसरातील मुलांना घरच्या सोप्यावर ते इंग्रजी शिकवू लागले. खांडेकरांनी याच काळात भटवाडीत छोटंसं वाचनालय सुरू केल. त्यामार्फत सभा, भाषणं असे लुटुपुटुचे समाजकार्य त्यांनी सुरू केले. याच काळात मेघश्याम शिरोडकरांसारखा ध्येयवेडा मित्र भेटला. ओळख स्नेहात बदलली. वाचनातून तयार झालेलं सुधारक मन व भोवतालची पारंपरिक वृत्ती व व्यवहाराच्या विसंगतीने खांडेकर सतत बेचैन असत. एकदा त्यांनी या विसंगतीवर बोट ठेवत लिहायचं मनावर घेतलं. दरम्यान 'नवयुग' मासिकात प्रकाशित झालेला ग. त्र्यं. माडखोलकर लिखित ‘केशवसुतांचा संप्रदाय' हा लेख खांडेकरांच्या वाचनात आला. त्यात माडखोलकरांनी गोविंदाग्रज (गडकरी) यांच्या ‘दसरा' कवितेवर कोरडे ओढले होते. त्यांचे आरोप खोडून काढणारा एक लेख खांडेकरांनी लिहिला.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/५६