पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/87

हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याचं आणखी एक छोटं नाटक. या नाटकातील संवादात प्रौढ औपचारिकता नाही. बालवयातील हरघडी तू मी करत चाललेल्या संवादातील भांडकुदळ अनौपचारिकता बाल-विश्वाच्या घटना यामुळे शेवडे गुरुजींची नाटके मुलांची वाटतात.
 विनोद हा प्रौढांप्रमाणे मुलांनाही भावणारा विषय. तो लक्षात घेऊन गुरुजींनी ‘जम्माडी जम्मत' या पुस्तकात दररोजच्या जीवनातील विसंगतीवर बेतलेले प्रसंग निवडून तयार केलेले चुटके संग्रहित आहेत. कोणत्याही मुला-माणसांच्या हातात हे पुस्तक जाऊ द्या, तो ते एका बैठकीत वाचल्याशिवाय उठणार नाही.
 गुरुजींनी बाळगाणीही लिहिली. ‘गंमतगीते' या नावाने ती प्रकाशित झाली. यांतील काही गीते मास्टर विनायकांना इतकी आवडली होती की, लतांनी त्याच्या रेकॉर्डस् कराव्यात, असे त्यांनी सुचविले होते.
 गुरुजी शाळेत असताना अनेक प्राथमिक शाळांत स्नेहसंमेलन, निरीक्षण, भेटी या निमित्ताने जात. एकदा ते असेच एका शाळेत गेले होते. स्नेहसंमेलनानिमित्त वर्ग सजावटीची स्पर्धा होती. गुरुजींना परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
 गुरुजी वर्ग पहात एका वर्गात गेले. वर्गात तक्ते लावले होते. त्यात एक कविताही होती. गुरुजी ओळखीची कविता म्हणून पाह लागले. वर्गशिक्षिका पुढे आल्या नि म्हणाल्या, 'मी कविता लिहिते. ही माझीच कविता आहे. गुरुजींना ती कविता आपली आहे हे सांगायचं धाडस त्या उत्साही बाईपुढे कसं होणार?
 शिक्षक नि साहित्यिकाइतकेच गुरुजी माणूस म्हणूनही मोठे आहेत. गुरुजींच्या सहवासात येणारा प्रत्येक मनुष्य हे नित्य प्रतिदिनी अनुभवत असतो. साधी राहणी नि उच्च विचारसरणी हा गुरुजींचा स्थायीभाव.

 सचोटी,प्रामाणिकता हा गुरुजींच्या जीवनमूल्यांतील एक अविभाज्य मूल्य. मी वि. स. खांडेकर तथा भाऊंच्या एका शिक्षण संस्थेत त्या वेळी सेवेत होतो. काही अंतर्गत मतभेद संदर्भात भाऊंना भेटायला गेले होते. गुरुजी भाऊंना वाचून दाखवत होते. गेलो सविस्तर बोलणे झाले. पण भाऊ मधल्या काळात निवर्तले. त्या बोलण्याच्या आधारे पुढे मी एक निवेदन काढले ते निवेदनच खोटे ठरविण्याचा प्रयत्न झाला. गुरुजींची साक्ष काढली गेली. गुरुजींनी सांगितलेले शब्द आजही माझ्या कानात आहेत. टेप जरी लावला असता तरी यापेक्षा वेगळे ऐकायला मिळाले नसते. त्याच्या आचरणातील या सचोटीनेच त्यांना गुरुजी बनवले आहे.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/८६