पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/95

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनुष्यपारखी समाजसेवक : के. डी. कामत

 १९७५ च्या दरम्यानची गोष्ट मी त्या वेळी कोल्हापूर येथील ‘आंतर भारतीच्या कारे गावकर हायस्कूलमध्ये शिक्षक होतो. हायस्कूलमध्ये शिक्षक असताना मी अनके विषय शिकवले आपल्या मूळ विषयाशिवाय अडचण म्हणून कधी कधी असंबंध विषय शिकवावे लागत, तर कधी आवडीचे म्हणूनही. त्या काळात मी ‘समाजसेवा' शिकवायचो. त्यात शिकवण्यापेक्षा कृतीवर भर असायचा. श्रमदान शिबिरही असायचे. अशाच एका श्रमदान शिबिराला तेथील काम पाहून संस्थेचे अध्यक्ष डॉ. ग. श्री. मिरजे यांनी त्यांचे बांधकाम व्यावसायिक मित्र के. डी. कामत यांना बोलाविले होते. कार्यक्रम झाल्यावर के. डी. कामतांचे आम्हाला कौतुक व मूल्यमापन करणारे पत्र आले. पत्रासाबेत कामाच्या किमतीएवढा मदतीचा धनादेश होता. सूचना होती की एवढ्या किमतीचे आणखीन सामाजिक काम भविष्यातही व्हावे. के. डी. कामत यांनी आचार्य विनोबांचे साहित्य वाचले की नाही मला माहीत नाही. पण ‘दान माणसास नादान करत' हे त्यांना माहीत होते. 'सत्पात्री नि चोखंदळ दान हे के. डी. कामतांच्यामधील समाजसेवक कार्यकर्त्यांचे व्यवच्छेदक वैशिष्ट्य होय. कुणीही यावे, मागावे नि घेऊन जावे, असं दानाचं सदावर्त त्यांनी कधी थाटलं नाही.

 के. डी. कामतांची नि माझी झालेली ही पहिली ओळख. ती औपचारिक व अल्पकालिक परिचयापुरतीच मर्यादित होती. पुढे मी पीएच.डी. झाल्यावर तत्कालीन ‘रिमांड होम'चे काम पाहू लागलो. आमची भगिनी (खरे तर मातृ) संस्था असलेल्या ‘अनाथ महिलाश्रम'चे ते अध्यक्ष होते.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/९४