पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/21

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाकी कारखानदारीचा फायदा यंत्रसामुग्री तयार करणारे कारखानदार, तंत्रज्ञ, कारखान्यातील अधिकारीवर्ग, कारखान्यातील कामगार, वाहतुकीची कामे मिळविणारे आणि सर्वात अधिक म्हणजे संचालक मंडळ यांनाच काय तो मिळतो. एका काळी ऊसतोडणी कामगारांची मोठी हालाखी होती. आज त्यांची स्थितीसुद्धा ऊसशेतकऱ्यापेक्षा जास्त चांगली झाली आहे. कारखानदारीचा लाभ ज्यांना मिळाला त्या समाजांचा थर शेतकरी समाजापासून अलग पडला. शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाविषयी त्यांना तळमळ नाही एवढेच नव्हे तर बहुधा ही मंडळी शेतकऱ्याच्या विरोधात उभी ठाकतात. थोडक्यात, साखर कारखानदारीने 'भारता'तील एक भाग 'इंडिया'त सामावून घेतला. 'भारत' जसाच्या तसाच राहिला.
 दुसरे एक मोठे चमत्कारिक उदाहरण दूधप्रक्रियेच्या उद्योगधासंबंधी आहे. डॉ. कूरियन यांनी परदेशातून दुधाची भुकटी आणि चरबी वर्षानुवर्षे फुकट मिळवून ती हिंदुस्थानातल्या बाजारात ओतली आणि दुधाचे भाव पाडले. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम झाला. पण दुधाची साठवणूक, वाहतूक, प्रक्रिया यांकरिता लागणारी संरचना त्यांनी मिळालेल्या भांडवलातून उभी केली. काही परदेशी कंपन्या दुधापासून लहान बालकांचे अन्न, चीज, लोणी इत्यादी पदार्थ भारतात बनवू इच्छितात, पण अशा योजनांना डॉ. कूरियन यांचा विरोध आहे. त्यांचे म्हणणे असे की दुग्धजन्य पदार्थांचा व्यवहार फायद्याचा आहे आणि शहरांना पेय दूध पुरविणे हा धंदा तोट्याचा आहे. त्यामुळे परदेशी कंपन्या फक्त फायद्याचे लोणी लाटू इच्छितात आणि दूधपुरवठ्याचा तोट्याचा धंदा मात्र सहकारी आणि सरकारी व्यवस्थांच्या डोक्यावर पडतो.

 युक्तिवाद दिसायला रास्त वाटतो, पण गंमत अशी की हिंदुस्थानात शेतकऱ्यांच्या दुधाला सर्वात जास्त भाव कोणी देत असेल तर सूरत येथील 'सुमूल' ही सहकारी संस्था. आज ती ६ टक्के स्निग्धांशाच्या दुधास शेतकऱ्यांना ७ रु. प्रतीलिटर किंमत देते. अगदी गुजरातमधीलसुद्धा कोणतीही संस्था शेतकऱ्यांना एवढी किंमत देऊ शकत नाही. सुमूल डेअरीला हे कसे काय जमते? सुमूलच्या अध्यक्षांचे म्हणणे आहे की ते फक्त पेय दुधांचाच व्यवहार करतात, दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याच्या भानगडीतच पडत नाहीत

२०
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने