पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/55

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नेहरूनीतीविरोधाची परंपरा
 शेतकरी संघटनेची ही जशी खुल्या बाजारपेठेच्या पुरस्काराची परंपरा आहे तशीच नेहरूवादाला विरोधाचीही एक परंपरा आहे.
 एक गोष्ट खरी आहे. एके काळी पंडित नेहरू, त्यांचं ते दिसणं, त्याचं ते रूप आणि त्यांचा तो गुलाब असं पाहिल्यानंतर त्यांच्यावर लट्टू झालेली जी तरूण पिढी होती त्या तरुण पिढीचा मीही एक सदस्य होतो. आज मला हे कबूल करतांना शरम वाटते. कारण, ज्यावेळी नेहरूव्यवस्थेवर टीका झाली आणि असं पहिल्यांदा म्हटलं गेलं की हे नियोजन नाही, ही लायसन्स-परमीट व्यवस्था आहे, तुम्ही नोकरशाही तयार करता आहात तेव्हा असं म्हणणारांना आम्ही मूर्खात काढत होतो. बोलणारी माणसं काही साधीसुधी नव्हती. त्यांच्यात, त्यागच मोजायचा झाला तर नेहरूपेक्षा कित्येक पटीने त्याग केलेला चक्रवर्ती राजगोपालाचारीसारखा मनुष्य होता. मला आज वाईट वाटतं आहे की, त्यावेळी आम्ही असं समजलो की चक्रवर्ती राजगोपालाचारी म्हणजे भांडवलदारांचे हस्तक आहेत; ए. डी. गोरवाला हे तर भांडवलदारांचेच, का तर, आय. सी. एस्. मधून रिटायर झालेले, कन्हैयालाल मुन्शी हे तर उजव्या बाजूचे; प्रा. रंगा हे काही शेतकऱ्यांचे नेते नाहीतच; मिनू मसानी - समजावादावर पुस्तक लिहून प्रसिद्ध झालेले - पण, ज्या अर्थी टाटांच्या नोकरीत होते त्याअर्थी ते लोकांचं कल्याण करणारे असूच शकत नाहीत. म्हणून आम्ही, ही मंडळी नेहरूंचं चुकतं आहे असं ठासून मांडत असतांनासुद्धा नेहरू आणि त्यांच्या समाजवादाचा जयजयकार केला.

 पण, ही गतकालातील चूक, कुठंतरी सुधारायला सुरुवात केली पाहिजे की नाही? चूक होऊन गेली, ती कबूलही करतो आम्ही. पण, नेहरूवादाला विरोध करणारा पहिला झेंडा, लायसन्स-परमिट राज्याला विरोध करण्याचा पहिला झेंडा हा चक्रवर्ती राजगोपालाचारींच्या नेतृत्वाखाली ‘स्वतंत्र पक्ष' या नावाने उभारला गेला. त्याला यश मिळालं नाही. कारण, सगळ्यांनी या प्रयत्नाला मूर्खपणाचे नाव दिले. 'स्वतंत्र पक्षा'चे कागदपत्र तपासून पाहिले तर असे दिसून येते की जेव्हां पंडित नेहरू जमिनीच्या वाटपाचे कार्यक्रम मांडत होते, सीलिंग ॲक्टच्या गोष्टी करीत होते, सामूहिक शेतीचा प्रयोग मांडत होते त्यावेळी स्वतंत्र पक्षा'चे लोक कळवळून सांगत होते की, “हा प्रश्न

५४
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने