या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वतन-वेतन.      ८५


उत्सव, संतानप्राप्ति , विवाह वगैरे प्रसंगी महार, मांग, कोळी, तमासगीर, गोसावी इत्यादिकांचे मानपान-हक्क होऊन बसल्या आहेत. असे खर्च न केले तर नामुष्की होते. 'भीक मंगना पन म्हशालजी रखना; 'ऋण फिटतें पण हीन फिटत नाहीं;' असला जमेदारी खाक्या असतो. त्यांचा मुशाहिरा पाहिला तर त्यांत नित्य खर्च निघणे कठीणः आणि नैमित्तिक खर्चासाठी वडिलार्जित स्थावर जंगम किती पिढ्या पुरणार ? मेहनत करून किंवा अक्कल लढवून कांहीं कमाई करावी तर अशा सोयी किंवा कारखाने खेड्यांत नसतात. तेव्हां येऊन जाऊन हात घालावयाला जागा म्हटली म्हणजे खुषीची किंवा जुलमाची पानसुपारी. वारसाची किंवा लायकीची चौकशी, रजिस्टराकडे ओळख किंवा मिळकतीची चतुःसीमा वगैरे कामांत गरजू पक्षकारांनी त्यांना खूष केले नाही तर दिवस मोडून काम बिघडते. पाटील-कुळकर्णी कलभंड असले तर त्यांचा प्रळय बराच फैलावतो. तरी पण वाम मार्गाने गबर होणे कठीण, हे लहान मूल देखील सांगेल.

 वतन मिळविण्यासाठी वतनदार एकमेकांचे उणे काढून त्यांना रसातळाला पोहोचविण्यास डोळ्यांत तेल घालून टपलेले असतात. तेव-

-----

१ एका गांवीं एका विधवेच्या नांवानें कुळकर्ण्याची आणेवारी लागली होती. ती तिच्या हयातीतच आपल्याला मिळावी, म्हणून तिच्या जवळच्या भाऊबंदाने ती व्यभिचारी असल्याचा बनावट पुरावा करून तिला वतनांतून वजा करण्याचा प्रयत्न केला. तो असाः-गांवच्या जननमरणाच्या रजिस्टराची एक प्रत महिनाअखेर डेप्युटी सॅनिटरी कमिशनरकडे जाते; व अस्सल कागद तालुक्यांत दोन वर्षांनी जातो. महिनाअखेर डेप्युटी सॅनिटरी कमिशनरकडील प्रत निघून गेल्यावर ह्याला युक्ति सुचली की, गांवच्या प्रतीत ती बाळंत झाल्याची नोंद करावी, आणि पुढे मागें तालुक्यांतून तिची नक्कल मागवून तिला व्यभिचारी ठरवावे, म्हणजे तिच्या नावावरील आणेवारी आपल्या नांवावर चढेल. काही वर्षांनी याप्रमाणे त्याने अर्ज देऊन चौकशी उपस्थित (पृष्ठ ८६ पहा.)