या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



फिरस्ते.
----------

 बहुशः सुगीच्या संधानांत व तुरळक इतर दिवसांत गांवगन्ना जे बिछायती ( बिछायत घरांत नसते, ती ओटीवर असतेः म्हणून बिछायती म्हणजे बाहेरून-पर ठिकाणाहून आलेला ) येतात त्यांत कांहीं वतनदार व कांहीं उपलाणी असतात. येथे वतनदार याचा अर्थ इतकाच की, हे फिरस्ते नियमित काळी नियमित रहाळांतील गांवीं येतात, व तेथे आपला माल विकून, काम करून, अगर भिक्षा मागून कमाई करतात. अशा प्रकारे उघाडीच्या दिवसांत हे अनेक गांवें घेतात, आणि पावसाळा ते स्थाईक झाले असतील त्या गांवी किंवा आपले रहाळांत कोठे तरी काढतात. जे फिरस्ते नेमलेल्या गांवीं वहिवाटीप्रमाणे न येतां वाटेल तेथें भटकतात, त्यांना आपण उपलाणी म्हणू. घिसाडी ऊर्फ पांचाळ, बेलदार, वड्डर, कैकाडी, वंजारी, लमाण, नेमाडांतील मेवाती, वैदू, गोंड, मांगगारोडी, गोपाळ, कोल्हाटी, हरदास, दरवेशी, बंदरवाले (मुसलमान), गारोडी, माकडवाले ऊर्फ कुंचेवाले, कंजारी, नंदीबैलवाले ऊर्फ तिरमल, चित्रकथी, फांसपारधी, बहुरूपी, रायनंद, भोप्ये, भगत, भुत्ये, आराधी, वाघे, मुरळ्या, जोगती, हिजडे, जोगतिणी, कातकाडीणी (हाडकांच्या माळा घालणाऱ्या नवलाया ), भराडी, वासुदेव, पांगूळ, गुरुबाळसंतोष, राऊळ, मेढिंगे ऊर्फ ठोके जोशी, कुडमुडे जोशी, सुप हलव्या, पोतराज, कानफाटे, उदासी, अघोरी, खरे खोटे आंधळे पांगळे रक्तपित्ये वगैरे विकल लोक, नाथपंथी, वारकरी, कबीरपंथी, संन्याशी, तीर्थयात्रा करणारे नाना संप्रदायांचे गोसावी, बैरागी, जती, साधु, जातिजातींचे गुरु व मागते, मानभाव, नानकशाही, फकीर, शिद्दी, इराणी, बलुची, अफगाणी इत्यादि अनेक प्रकारचे उदरनिमित्त बहुकृत वेष लोक खळी मागण्याला व इतर वेळी खेड्यांवर फेऱ्या घालीत असतात. ह्यांची दिनचर्या वरवर पाहिली तर असा भास होतो की, त्यांपैकी कित्येकांना काही तरी कला-