या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फिरस्ते.      १२३

तांड्यांत जाण्याला धजत नाहीत. त्यांत कोणी गेलें तर पुरुष वर्दळीला येतात, व बायका एकच गिल्ला करून सोडतात, आणि वेळेला सपशेल नागव्या होतात. कधी कधी त्या स्वतःला किंवा पोराला आपल्या हाताने दुखापत करून घेतात, अगर पोराची तंगडी धरून त्याला गरगर फिरवितात व आपटूं लागतात. फांसपारध्यांचा जथा फार जंगी असतो. त्यांच्या तळावर कधी कधी माणसें १०० पर्यंत असतात; शिवाय गाई, म्हशी, कोंबड्या, कुत्री. ते भीक मागतात, बजरबट्टू व जंगलच्या वनस्पतींची औषधे विकतात, पांखरें धरतात, आणि हरीण, डुक्कर, ससे, ह्यांची शिकार करतात. त्यांच्या बायका जात्याला टांकी लावतात. ते आपली गुरे उभ्या पिकांत चारतात, व पेवांतील धान्य, गुरे, शेळ्या, मेंढ्या, व उभे पीक ह्यांची चोरी करतात, आणि जमिनीमध्ये लहान भेग असेल ती खोदून तळाशी मोठी सांच करून तिच्यामध्ये चोरीचें धान्य घालून तोंड बंद करतात. खानदेशांत सातपुड्यांतील जंगलांत प्रतिवर्षी नेमाडाकडील मेवाती नांवाचे मुसलमान लोक हजारों गाईम्हशी व घोडे चारण्यास आणतात. ते जंगलाची फी भरतात, परंतु आसपासच्या गांवांच्या शेतांना त्यांचा अतिशय उपसर्ग लागतो. शेतांत राखणदार असला तरी पाण्यावर जातांना किंवा या गांवाहून त्या गांवाला मुक्काम हालवितांना ते आपल्या गुरांना शेतांत घुसण्याची इशारत देतात. मग राखण नसल्यावर रात्री बेरात्री ते आपली जनावरें शेतांत घालतात हे सांगणे नकोच. त्यांची जनावरे इतकी तरबेज झालेली असतात की, त्यांना परकी माणसांचा वास येतांच ती चौखार निघतात, आणि कांहीं केल्या हाती लागत नाहीत. पहाडांत वाघाची भीति असते, म्हणून शेतांत रात्री राखण बहुधा नसते. त्यामुळे ह्या हेड्यांचे आयतेंच बनतें. चार सहा वर्षांनी बायकापोरे मिळून शेपन्नास इराणी किंवा बलुची, पठाण लोकांची टोळधाड रेलवेजवळच्या खेड्यांनी आणि क्वचित आडरस्त्याच्या खेड्यांनीही बोकळते. घोडे, चाकू, कात्री, सुया, कपडा, जुने बूट, सोन्यारुप्यांची नाणी, जवाहीर वगैरे विकण्याच्या मिषाने ते फिरतात.