या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फिरस्ते.      १२५

तर राखणदाराला शेत मोकळे टाकून गांवांत कोंडवाड्यापर्यंत यावे लागते. पाटील भेटला आणि गुरे ताब्यात घेण्याला महार चावडीवर असला तर बरें, आणि जर कां दोघांपैकी एकाची गांठ पडली नाही तर तिष्ठत बसावे लागते. इतकी फुरसत शेतकऱ्यांला कोठून असणार ? आणि असली तरी नंगेसे खुदा बेजार. भिकाऱ्यांशी अदावत करून घरादाराचा उन्हाळा होण्याची भीति असते. शिवाय भिकार जाती पोरांपासून तो म्हाताऱ्यांपर्यंत लोंचट, आर्जवी, किंवा तंबी देणाऱ्या असतात. मुळी गुरांमागची पोरेंच दादा बाबा करून जनावरें सोडून न्यावयाची. त्यांची डाळ शिजली नाही तर तळावरील बायका, पुरुष, कुणब्याभोंवतीं घों घों जमतात व हातापायां पडतात. त्यांच्याही पुढे कुणब्याने आपला हेका सोडला नाही, तर ते गांवच्या शिष्टांकडे जातात, आणि उलट ते कुणब्यालाच हलकट ठरवून त्याला जनावरे सोडून देण्याची गळ घालतात. कारूनारूंची व अठरापगड भिकारांची जनावरें बाराही महिने शेते खात असतांना शेतकरी त्यांना कोंडवाड्यांत घालतात असें कां आढळून येत नाही, ह्यांतलें इंगित हे आहे. ज्या बायका गवतासाठी किंवा सरपणासाठी रान घेतात, त्या बहुधा राखणदाराचा डोळा चुकवून शेतांत घुसतात. चोरपावलाचा त्यांना बालाभ्यास असतो. त्या नसेल तेथन वाट पाडतात, व कांहीं कुपाटी काढली असल्यास ती बुजवीत नाहीत; कारण रात्री चोरी करण्याला ती आड-वाट उपयोगी पडते. शेतांत आल्यावर त्या ते वाटेल तसें तुडवितात; पिकें मोडतात; बांध, पाट, आळी, ढासळतात; गवत वेंचतांना भाजी, पाला, धान्य, फळे, ओटींत भरतात; आणि तेथल्या तेथें खाण्यासारखे असेल तें शेळीसारखें बकाबका झपझप खातात. शेताच्या मालकाची नजर गेली आणि तो लांबून ओरडला, तरी त्यांचे हात-तोंड चालूच राहते. जवळ येऊन तो फळे, भाजी, कणसें, परत घेऊ लागला तर त्या त्याची करुणा भाकतात, आणि नच जुळले तर गळा काढून कपाळाला स्वतःच दगड मारून घेऊन रक्त काढतात, आणि कुभांड रचतात की चार ठोंबांसाठी निष्ठुर कुणबी जीव घ्यावयाला उठला.