या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फिरस्ते.      १४१

किंवा स्त्रीला आजन्म ब्रह्मचर्य-वृत्तीची दीक्षा देऊ नये, आणि बारा वर्षीच्या आंत कोणालाही चेला बनवू नये अशी कायद्याची अटक सरकारने घातली, तर पुष्कळच काम होईल. गुन्हेगारजातींचा गुन्हे करण्याचा धंदा सुटावा म्हणून हिंदुस्थान सरकारने गुन्हेगार जातींचा कायदा (इ० स० १९११ चा तिसरा ) पास केला आहे; आणि मुंबई सरकारनें तो सात आठ जिल्ह्यांत १०-११ जातींना लागू केला आहे. गुन्हेगार जातींतील इसमांची नांवें नोंदून त्यांनी नेमल्या प्रदेशांत स्थाईक झाले पाहिजे, ठरविलेल्या हद्दीबाहेर भटकू नये; ६ ते १८ वर्षांच्या वयापर्यतची मुले शाळेत घातली पाहिजेत, वगैरे निर्बध सदर कायद्याअन्वयें सरकारला करतां येतात. हा कायदा यशस्वी करण्यास लोकांनी सरकारला मदत केली तर बहार होईल. गांवकऱ्यांनी व गांवकामगारांनी मनांत वागविलें असते, तर सर्व आयतखाऊंचा बंदोबस्त मागेंच झाला असता. पीनल कोड सर्वांना पुरून उरलें आहे. खेरीज पोलीस आक्ट, कोंडवाड्याचा आक्ट वगैरे त्याची पिलें आहेतच. मागणाराने शेतांत किंवा घरांत पाऊल ठेवलें की अन्यायाची आगळीक होते; रोप तुडविलें की अपक्रिया आणि खुडलें की चोरी होते. दुसऱ्याच्या मालांत गुरें चारली तर पिनल कोडची अपक्रिया होऊन शिवाय कोंडवाड्याचे आक्टाप्रमाणेही गुन्हा होतो. सर्व भटके गदळ राहतात आणि मुक्कामाच्या गांवांत व आसपास अति घाण करतात. अगोदरच खेड्यांत स्वच्छता कमी आणि त्यांत फिरस्ते उतरले म्हणजे गावापासून अर्धा-पाव मैल नाक धरल्याशिवाय चालतां येत नाही. घाणीचे खटले करूनही त्यांचा प्रवास अडचणीचा व खर्चाचा करता येईल, व सार्वजनिक खजिन्यांत थोडी फार भर पडेल. तेव्हां जरूर ते कायद्याचे साह्य घेऊन सर्वांनीच ही सार्वजनिक पीडा घालविण्यास झटले पाहिजे.