या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कुणबी.      १७५

अलुतदार-बलुतदार नुसतें कुणब्यांचेच काम करितात असें नाहीं, तर ते सर्व नारभाऊ-कारभावांचे जातिविशिष्ट काम फुकट म्हणजे पैसा अगर धान्य न घेतां करतात. तसेंच गांवची जबाबदारी वतनदारांत समाईक असल्यामुळे गांवांत कायम वस्तीला किंवा थोडा वेळ मुक्कामाला आलेल्यांची कामेही त्यांना फुकट करावी लागत व लागतात. जमीन अगर वतनी काम नसलेल्या मुसलमान रहिवाशांची व अतिथि-अभ्यागतांची कामें लोहार, सुतार, परीट,न्हावी, चांभार, आज मित्तीला सुद्धा फुकट करतात. पूर्वीच्या अमदानींत परगणेवतनदारांचे व ग्रामाधिकाऱ्यांचे कारूनारूंवर हक्क असत, आणि सरकारी कामगारांचीही त्यांना पुष्कळ वर्दळ लागे. तेव्हां कुणबी, कारूनारू, पै-पाहुणा आणि हक्कदार ह्या सर्वांची करावी लागणारी खासगी व गांवकांची कामें व द्यावे लागणारे हक्क हे सर्व जमेंत धरून आलुत्याबलुत्याचा निरख ठरला; आणि सगळे अडाणी मोकळे राहून समस्तांच्या योगक्षेमासाठी तो एकट्या कुणब्याने पुरा पाडण्याचा जो एकदां भार उचलला तो अद्यापि बिचारा वाहत आहे. पृथ्वी व समुद्र मोकळा आणि जंगल मिठाची सवलत, काळी मुबलक व नवट आणि कुणबी थोडा, अशा वेळी हा धारा पडला. धारण स्वस्ती आणि सर्वांना पोटभर खाण्याइतका गांवोगांव दाणा शिल्लक असे, म्हणून आजपर्यंत कोणीही बलुत्येआलुत्ये व त्यांची कामे ह्यांचा हिशेब चुकून केला नाही. तशांत कुणबी मायाळू आणि भिडस्त व इतर सर्व काढू पडले. ह्या व असल्या अनेक कारणांनी ह्या अगोदरच्या जड बोजांत आणखी भर पडली. आतां कारूनारूंच्या डोक्यावरील जमेदारी हक्क गेले; सरकारच्या सर्व खात्यांत सुधारणा होऊन त्यांची कामें हलकी झाली, व कित्येक कामें अजिबात वजा पडली. रयतवारी पद्धतीमुळे खातेदार किंवा कबजेदार कुणबी कारूनारूंच्या गांवकी कामाबद्दल सरकारला किंवा गांवाला जबाबदार नाही. व्यापारवृद्धामुळे बरीच हत्यारे व जिनसा आयत्या मिळतात, किंवा कारूंच्या अडाणीपणामुळे विकत घ्याव्या लागतात. दाम सुकाळामुळे एनामेल, तांबे, पितळ, वगैरेंची भांडी जास्त प्रचारांत आली आहेत.