या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७८      गांव-गाडा.

याचें; बलुत्ये, भिकार वगैरे सर्व हक्क, दानधर्म त्यावर भागवावयाचे, आउत काठी, सरपण यांसाठी त्यांतील झाडे तोडावयाची, आपल्या शेताचें राखण खंबीर करण्यासाठी वेळ पडल्यास बटाईचे शेत मोकळे टाकावयाचे, व इतक्यावरही ताण म्हणजे आपण बायकापोरांनिशीं चोरवेल तितकें धान्य चोरावयाचे आणि अखेर मालाचा मोधळा (जाड ठोसर धान्य ) मालकाच्या हाती लागू न देतां अकणनिकण कालवून बटाईचे किंवा मक्त्याचे धान्य त्याच्या माथीं मारावयाचें ! कुळाचे नाते आहे तोपर्यंत गरिबी गाऊन आणि पहिल्यापहिल्याने भलाई दाखवून कुणबी आपल्या सावकार जमीनदाराकडून पुष्कळ रोखीची व धान्याची उचल करतात. अशा रीतीने कुणब्याशी पालथा रोजगार करून तोंडघशी पडलेले पेन्शनर बरेच दिसून येतात. 'गोगल गाय आणि पोटांत पाय.' कुणब्याच्या शब्दावर किती भरंवसा ठेवावयाचा, त्याची खरी खोटी नड कोणती, तो कशांत गोता देतो व त्याजकडे रुतलेला पैसा कसा काढावयाचा हें एक भलें मोठे शास्त्र आहे, व ते अनुभवाने येते. पुष्कळांना त्याचा गंध नसतो. शेतीत भांडवल गुंतवून शेकडा ३।४ टक्केसुद्धां व्याज सुटत नाही, उलट सारा पदरचा द्यावा लागतो असें अहमदनगर जिल्ह्यांतले पुष्कळ नव्या थळीचे पांढरपेशे लोक कुरकुरतात. ह्यामुळे मोहबतीच्या लोकांचे हलक्या व्याजाचं भांडवल शेतीतून दुसरीकडे जातें, व गांवांतली सधन लोकांची वस्ती उठते, हे कुणब्याला उमजेल तो सुदिन समजावयाचा ! दक्षिणी सावकाराशी जर कुणबी इमानाने वागता व 'खाटकाला शेळी धारजिणी' हा न्याय खोटा करून दाखविता, आणि दक्षिणी सावकारही देशकालवर्तमान पाहून आपल्या परप्रांतीय व्यापारबंधूंजवळून आत्मसंरक्षणापुरते व्यापारी कसब शिकते तर मारवाडी-गुजराती-रोहिल्यांच्या व्यवहारावर दाब राहता; आणि कुणबीही इतका कर्जबाजारी झाला नसता. कुणब्यांंमध्ये दिवाळखोरी इतकी वाढली आहे की, खळ्यांतून सबंध बर्षाचा चंदी फार थोड्यांच्या घरी येते. सुमारे चार सहा महिन्यांची चंदी वागविणारे कुणबी बरेच आहेत. अगदी महिन्या दोन महिन्यांची खावटी उरते असे कुणबी कशी बशी पाळीगोपाळी घालून शेत कोणा आप्तांच्या