या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२००      गांव-गाडा.

करतां तात्कालिक जरूरीप्रमाणे करतो. आज अमुक जिन्नस लागला, उपस कणगींतील धान्य आणि घे तो, दुकानदाराचा किंवा सावकाराचा तगादा आला तर घाल त्याला धान्य, आज एका धान्याचे बीं आणिलें, उद्यां खत आणिलें, परवां घोंगडी घेतली, असा त्याचा क्रम चालतो. ह्यामळे तो विकतो त्या मालाला भरपूर किंमत येत नाही व घेतो त्याला मात्र अडून जबर किंमत द्यावी लागते. ह्यापेक्षां गांवचे कुणबी मिळून सर्वांचा माल एकदम विकण्यास काढतील, आणि आपल्याला सर्वसाधारणपणे लागणारे जिन्नस जर घाऊक खरेदी करतील तर त्यांना त्यांच्या मालाची भर किंमत मिळेल, आणि खरेदी जिनसाही पुष्कळ नफ्यानं मिळतील. एक सट्टा माल खरेदीला थेट मोठ्या पेठेचें गिऱ्हाईक गांवीं येऊन उतरेल, आणि पुष्कळ माल मिळतो म्हणून देववेल तितकी जास्त किंमत चढाओढीने देईल. तसेंच, कुणब्यांना एकदम पुष्कळ जिनसा घेणे असल्या म्हणजे मोठे गिऱ्हाईक म्हणून व्यापारीही सवलतीने माल देतील. त्यामुळे खेड्यांतील लोक आणि पेठ ह्यांच्यामध्ये व्यापार करणाऱ्यांंच्या ज्या अनेक पायऱ्या आहेत, त्या मोडून त्यांचा नफा कुणबी व कसबी ह्यांच्या पदरांत पडेल. कुणबी गांवचा वाणी अगर हळकरी ह्यांच्या आड, तो पेठेच्या उदम्याच्या आड, तो शहरच्या उदम्याच्या आड,तो मुंबईच्या व्यापाऱ्याच्या आड,असें ह्याच्या आड तो त्याच्या आड हा चरत चरत सर्व लोणी उडते, आणि अखेर कुणब्याला अगर कसब्याला घट्ट ताकसुद्धा राहत नाही. व्यापार कितीही वाढला तरी हा आपला बिचारा. . 'ज्याचे त्याला आणि गाढव ओझ्याला ' अशी त्याची अवस्था दिसून येते; त्याच्या लंगोटीच्या जागी पंचासुद्धा येत नाही. तेव्हां ठिकठीकाणचे व्यापारी व आडत्ये जो अघर फायदा घेतात, तो कुणब्यांच्या आणि कसब्यांच्या हाती पडल्यास ते सुसंपन्न कां होणार नाहीत ? घाऊक मालाची विक्री-खरदी करून खेड्यांतल्या सहकारी मंडळ्यांना हा नफा थोड्या श्रमानें मिळेल, व त्याकडे त्यांनी अवश्य लक्ष द्यावें.

-----

 १ संगमनेर येथें पतपेढीच्या दुकानांतून साळ्यांना सूत पुष्कळ पटीने भावांत स्वस्त व गुणांत सरल मिळू लागले आहे.