या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४६      गांव-गाडा.

वर भरावें, त्याबद्दल त्यांचे घर उन्हांत बांधून कसे चालेल?' इत्यादि. गोंडणीने चोळी घातली तर तिची जात तिला वाळीत टाकील, व इतर लोकांची ती कटाक्षविषय होईल. व्यभिचारी व गुन्हेगार जमातींच्या लोकांच्या मनाची व शरीराची व्यक्तिशः स्थिति, आणि त्यांच्या कृत्यांच्या शुभाशुभपणाबद्दल त्यांची व एकंदर समाजाची भावना ह्या दोन्ही गोष्टी त्यांचे अनाचार व दुराचार निरंतर चालू ठेवण्यास अनुकूल अशाच आहेत. व्यभिचारी व गुन्हेगार जातींचे लोक आपापल्यापरी लहानपणापासून आपल्या धंद्यासाठी योग्य असें शरीर बनविण्याची तयारी करतात. पुढे हातावर मेखा सोसतां याव्या म्हणून उचले आपल्या पोरांना नित्यनियमानें बडवतात; हल्ला परतवतां यावा म्हणून अंगावर चालून येणारावर पळतां पळतां पायांच्या बोटांनी धोंडे भिरकिवण्याची विद्या कैकाडी बाळपणींच शिकवितात; दरोडेखोरांच्या घोड्यांनादेखील चोरपाऊल असते; आणि बाजारबसव्या जाती लहानपणापासून आपल्या मुलींना नखरे, व मुंढे हिजड्यांना चाळे शिकवितात. हे लोक ज्या समाजांत वाढतात, ते त्यांचे दुष्कृत्य कुलाचार व जातिधर्म आहे, अशी त्यांची बाळपणीच समजूत घालून देतात; आणि त्यांत त्यांचे जसजसें पाऊल पुढे पडते तसतसे त्यांचे जातभाई त्यांना जास्त मान देतात. इतर समाजांच्याही नाकाची घाण मरत जाते, आणि अखेर त्यांना आपल्यांतल्या ह्या धर्मबंधूंची व त्यांबरोबर आपली अधोगति होते, असे मुळीच वाटत नाहींसें झालें आहे. उलट त्यांतले लाखों भाबडे लोक ह्या अनातिमान् जातकसबाबद्दलही सकौतुक आदर दाखवितात. एखाद्या घरचा किंवा गांवाचा किंवा जातीचा एखादा दुसरा मनुष्य दुर्वर्तनी निघणे व सबंध

-----

 १ करमाळ्याकडे मांगाचे वडगांव म्हणून एक गांव आहे अशी दंतकथा आहे की, पूर्वी तेथें एक मांग अवतारी पुरुष होऊन गेला. त्याला शेगूडचा (शिव-गड ) खंडोबा इतका प्रसन्न होता की, त्याने पैज मारुन तुळजापरची देवी लुटली आणि आगाऊ जागे करून चौकीपहाऱ्यांतून तिचा मुगुट चोरुन आणला! तो लोकांच्या नवसाला पावतो !!!